उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे सिंधुदुर्ग तरुणांना नोकरी, व्यवसाय देणारा जिल्हा ठरणार - केंद्रीय मंत्री राणे
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 11, 2024 07:20 PM2024-03-11T19:20:11+5:302024-03-11T19:21:32+5:30
सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
सिंधुदुर्ग : भारत सरकारच्या या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा तरुणांना नोकरी देणारा आणि व्यवसाय देणारा जिल्हा ठरेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ते एमएसएमई विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमांत बोलत होते.
सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन, शिलान्यास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, दिल्ली येथील सुधा केसरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, एमएसएमई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी. एम. पार्लेवार आदी उपस्थित होते.
सुरुवातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते विविध भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्राच्या इमारत भूमिपूजन शिलान्यासचे अनावरण करण्यात आले. तदनंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना घडविण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र या जिल्ह्यात सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५ कोटी २८ लाख भारत सरकार खर्च करणार आहे. पीएम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबविली जात असताना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा सोमवारी केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला आहे.
समाजाच्या विकासासाठी प्रयत्न
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहत असलेल्या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण नंतर त्यांना योग्य अशा ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्याच्या बाहेर जाणार युवक जिल्ह्यातच थांबणार आहे. आपल्या बरोबर समाजाचाही विकास व्हावा अशी आपली धारणा असून आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोबतच समाजाचाही विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनदेखील मंत्री राणे यांनी यावेळी केले.