सिंधुदुर्ग : राणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:08 PM2018-04-11T15:08:40+5:302018-04-11T15:08:40+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.
नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी असते. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली आहे.
नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी भाजप शिवसेना युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदेश पारकर हे माजी नगराध्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. तर स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने या आघाडीचे समीर नलावडे हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. गाव विकास आघाडीतर्फे राकेश राणे आणि काँग्रेसतर्फे विलास कोरगावकर हे अन्य दोन उमेदवार रिंगणात असल्याने नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या १६ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १0 मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानंतर गुरूवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून त्याची तयारी देखील केली आहे. त्यामुळे कणकवलीचा नगराध्यक्ष कोण होणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनोख्या निवडणुकीची राज्यभर चर्चा
नारायण राणे भाजपातर्फे राज्यसभेवर खासदार आहेत. नारायण राणेंचे सुपूत्र नीतेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. असे असताना राणे किवा नीतेश यांना त्यांच्या स्वाभिमान पक्षासाठी मतदान करा, असे जाहीर आवाहन करता येत नव्हते.
राणे आणि नीतेश या दोघांनीही स्वाभिमान पक्षासाठी काम केले. मात्र, त्यांनी या निवडणुकीत कुठल्याच पक्षाचा उल्लेख न करता केवळ उमेदवारांना टार्गेट केले. तर दुसरीकडे राज्यभरात एकमेंकावर दररोज चिखलफेक करणारे राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप येथे एकत्र लढले. त्यामुळे कणकवलीच्या या अनोख्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती.