जय शिवाजी... सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:33 PM2018-04-04T13:33:33+5:302018-04-04T14:18:02+5:30
शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या.
सिंधुुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरु करण्यात यावे, ही मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी केली होती त्या संदर्भात मंगळवारी पुरातत्व विभागाच्या महानिदेशक उषा शर्मा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या.
पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली या मंदिराचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकर सुरु केले जावे असे स्पष्ट निर्देश मंगळवारी संभाजीराजे यांच्या उपस्थितित उषा शर्मा यांनी दिले. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी व पुरातत्व खात्याचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.
भारत सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्याला २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सरंक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर या मंदिराच्या संवर्धनाचे जे काम होते ते ठप्प झाले होते. त्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यातील काम, सभा मंडपाचे काम यासह बºयाच ठिकाणी मंदिरात पाण्याची गळती होते.
यामुळे शिवप्रेमींकडून मंदिराच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याची बाब खासदार संभाजीराजे यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये पुरातत्व विभागा बरोबर झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. राज्य सरकारने वारंवार पुरातत्व विभागाशी पत्र व्यवहार करुन या मंदिराचे काम चालू करणे किती महत्वाचे आहे. पटवून दिले तरी सुद्धा या कामाला पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळत नव्हती.
पन्हाळगडावर लाईट अॅण्ड साउंडला मान्यता
पुरातत्व विभागाबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापुर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या पन्हाळागडावर लाईट अॅण्ड साउंड शो सुरु करण्यास या बैठकीत तत्वत: मान्यता दिली.