आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्गचे काम कौतुकास्पद - ओमप्रकाश शेटे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:37 PM2024-02-17T17:37:25+5:302024-02-17T17:37:48+5:30

सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यात राबविणार

Sindhudurg work in Ayushman Bharat Yojana appreciated says Omprakash Shete | आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्गचे काम कौतुकास्पद - ओमप्रकाश शेटे 

आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्गचे काम कौतुकास्पद - ओमप्रकाश शेटे 

ओरोस : आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम कौतुकास्पद असे आहे. त्यामुळे या योजनेचा सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यात राबविणार असल्याचे सांगतानाच आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कॅम्प घ्या, असे आदेश आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यावेळी माहिती देताना डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याचे काम २ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले असून, सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ६२ हजार ९४ पात्र लाभार्थींपैकी ३ लाख ९७ हजार ४४५ एवढी कार्ड काढण्यात आली आहेत. जिल्ह्याचे काम ६० टक्के एवढे पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५ हजार १२२ रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, ५ कोटी ६३ लाख एवढा निधी या योजनेमार्फत खर्च करण्यात आला आहे.

६० टक्के आयुष्यमान कार्ड वितरीत

सर्व यंत्रणेने अतिशय सक्षमपणे काम केल्याने हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत ६० टक्के आयुष्यमान कार्ड वितरित झाली आहेत. उर्वरित कार्ड आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेमध्ये कॅम्प घेऊन वितरित करण्याच्या तसेच ३ मार्च रोजी होणाऱ्या पोलिओ डोसवेळी कार्ड काढण्याच्या सुविधा उपलब्ध करा, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या असल्याची माहिती आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Sindhudurg work in Ayushman Bharat Yojana appreciated says Omprakash Shete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.