सिंधुदुर्ग : कणकवलीत मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव : दादासाहेब मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:23 PM2018-10-12T17:23:57+5:302018-10-12T17:27:12+5:30
कोल्हापूर विभागाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे यजमानपद कणकवली महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा युवक महोत्सव २१ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे यांनी दिली.
कणकवली : कोकण हे कलेचे माहेरघर आहे. विविध सांस्कृतिक कलांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असते. त्यामुळे आगामी इंद्रधनुष्य महोत्सवात मोठ्या प्रमाणात कोकणातील विद्यार्थ्यांचा समावेश असावा यासाठी कोल्हापूर विभागाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे यजमानपद कणकवली महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा युवक महोत्सव २१ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे यांनी दिली.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक विजय सावंत, सहसंयोजक प्रवीण सावंत, युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा. हरिभाऊ भिसे, वेंगुर्ले केंद्रप्रमुख तुषार वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब मोरे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र कोल्हापूरअंतर्गत हा १६ वा युवक महोत्सव होत आहे. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अध्ययन करताना आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ हा महोत्सव ठरणार आहे. अनेक कलाकार या कोकणात घडलेले आहेत. कलेच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत आपली कला सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना या महोत्सवामुळे मिळते.
या महोत्सवाचे उद्घाटन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. डी. कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष भाईसाहेब खोत, सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत एकांकिका, मूक अभिनय, प्रहसिका, लघुनाटिका, नकला, शास्त्रीय तालवाद्य, सूरवाद्य, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन, भारतीय सुगम गायन, समूहगीत, पाश्चिमात्य समूहगीत, लोकसंगीत, वाद्यवृंद्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व व वादविवाद, काव्यवाचन, चित्रकला, स्थळचित्रण, कोलाज, व्यंगचित्र, रांगोळी, फोटोग्राफी आणि रचना यांसह अन्य विविध कला या युवा महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २५ वर्षे असावी लागणार आहे.
विजेत्या विद्यार्थ्यांना विभागातून नाशिक विद्यापीठ येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवात सहभाग मिळणार आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण मोफत केले जाणार आहे. मुक्त विद्यापीठ नाशिकने तृतीयपंथी व कैद्यांना मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापुरात चालूवर्षी ३५० कैद्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. या स्पर्धा नि:पक्षपाती घेतल्या जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.