सिंधुदुर्ग : कसाल येथील अपघातात गोव्याचा युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:30 PM2018-05-08T15:30:22+5:302018-05-08T15:30:22+5:30
कसाल येथे आपल्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या गोवा येथील विष्णु तेली याच्यावर काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या आराम बस आणि मोटर सायकल अपघातात विष्णु जयवंत तेली (२३, मूळ रा. कोंडुरा, सध्या रा.वास्को, गोवा) हा जागीच ठार झाला तर त्याच्या मागे बसलेला प्रमोद प्रभाकर पाटील हा गंभीर जखमी झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी : कसाल येथे आपल्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या गोवा येथील विष्णु तेली याच्यावर काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या आराम बस आणि मोटर सायकल अपघातात विष्णु जयवंत तेली (२३, मूळ रा. कोंडुरा, सध्या रा.वास्को, गोवा) हा जागीच ठार झाला तर त्याच्या मागे बसलेला प्रमोद प्रभाकर पाटील हा गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल, नवाबाझार येथे सोमवारी पहाटे ५.४५ वाजता खासगी आराम बस व दुचाकी यांच्यात झाला. अपघातात दुचाकीस्वार विष्णू तेली हा जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला प्रमोद पाटील हा गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आपल्या मावस बहिणीच्या लग्नासाठी गोवा येथून पाच मे रोजी विष्णू व तक्रार दिलेला मावस भाऊ सुरज सातार्डेकर आदी कसाल येथे दाखल झाले होते. दरम्यान विष्णू आणि त्याचे नातलग प्रमोद पाटील हे एका कामासाठी सोमवारी पहाटे साडेपाच वाजता कसाल तेलीवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.
दुचाकी (जीए-०६.आर १६४८) महामार्गावरील कसाल-नवाबाझार येथे आली असता याच दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणारी (एम.एच.११ सीएच ९६७६) ही आराम बस या दोघांत अपघात झाला.
अपघात एवढा गंभीर होता की दुचाकीस्वार विष्णू हा जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला प्रमोद हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करून त्यानंतर अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेलीवाडी येथे राहणाऱ्या मावस बहिणीचे ८ मे रोजी लग्न असल्याने सर्व तेली कुटुंबिय एकत्र आले होते. रविवारीच हळदीचा कार्यक्रम झाल्या नंतर मंगळवारी लग्न होते. मात्र विष्णुच्या अपघाती निधनाच्या बातमीनंतर या मंगलमय वातावरणावर विरजन पडले आहे.