सिंधुदुर्गनगरी : विषय समिती सभापती निवडणूक कोरमअभावी रद्द

By Admin | Published: October 2, 2014 11:28 PM2014-10-02T23:28:03+5:302014-10-02T23:32:15+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांची सभेकडे पाठ

Sindhudurga Nagari: Subject committee chairman cancellation of election quibbling failed | सिंधुदुर्गनगरी : विषय समिती सभापती निवडणूक कोरमअभावी रद्द

सिंधुदुर्गनगरी : विषय समिती सभापती निवडणूक कोरमअभावी रद्द

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी बोलविण्यात आलेल्या खास सभेकडे जिल्हा परिषदेच्या सर्वच सत्ताधारी सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही पाठ फिरविल्याने ही सभा पीठासन अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी रद्द केली.
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतिपदासह महिला व बालविकास सभापतिपद तसेच दोन विषय समिती सभापतिपदांची अडीच वर्षांची मुदत १ आॅक्टोबरला संपल्याने या पदांच्या नव्याने निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने आज खास सभेचे आयोजन केले होते. या निवडणुकीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी नामनिर्देशन पत्र भरावयाचे होते. मात्र, नियोजित वेळेत जिल्हा परिषद सदस्यांमधून एकाही उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी तीन वाजता खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सभा सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जी. आर. गावित, आदी उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी अर्ज दाखल केला नाही, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही या पदांसाठी एकही नामनिर्देशनपत्र न भरल्याने अनपेक्षितरीत्या सत्ताधाऱ्यांना साथ मिळाली. विरोधी गटाच्या सदस्यांकडून एका पदासाठी जरी नामनिर्देशनपत्र सादर केले असते, तर सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली असती. या निवडणुकीला सामोरे जाणे आणि इच्छुक सदस्यांच्या मोठ्या संख्येतून केवळ चार सदस्यांची निवड करणे जोखमीचे बनू शकले असते, असे बोलले जात आहे.
काँग्रेसची रणनीती
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सत्ताधारी सदस्यांमध्येच नाराजी पसरली होती. आताच्या निवडीमध्ये एखाद्या सदस्याला जरी सभापतिपद दिले, तरी इतर सदस्य नाराज होतील व त्याचा फटका विधानसभा निवडणुकीला बसेल याचा सारासार विचार करून आजची विषय समिती सभापतीची निवडणूक पुढे ढकलण्याची रणनीती जिल्हा काँग्रेसने अवलंबिली असल्याची चर्चा सुरू होती.
पुन्हा निवडणूक होणार
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी रद्द करण्यात आलेली आजची निवडणूक प्रक्रिया पुढील काही दिवसांनी केली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा निवडणूक कार्यक्रम आखला जाणार आहे. (प्रतिनिधी)

सदस्य प्रचारात : सावंत
याबाबत जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले सर्व पदाधिकारी, सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्याने तसेच आचारसंहितेमुळे निवड झालेल्या सदस्यांना आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. यामुळे निवड न करता जिल्हा परिषद अध्यक्षांकडेच तूर्तास सर्व पदांचा कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच निवड प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा निर्णय घेत नामनिर्देशनपत्र दाखल केले नसल्याचे सांगितले.


इतिहास घडला...
जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडणूक प्रक्रिया रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांनीही नामनिर्देशनपत्र सादर केले नाही. निवडणूक प्रक्रियेकडेच सर्वांनी पाठ फिरविली. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला ही निवडणूक प्रक्रियाच तूर्तास रद्द करण्याची वेळ आली.

Web Title: Sindhudurga Nagari: Subject committee chairman cancellation of election quibbling failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.