सावंतवाडी कारागृहाला नवीन झळाळी, सिंधुमित्र प्रतिष्ठाने रंगरंगोटी करत बंदीवानांसाठी राबविले अनेक उपक्रम
By अनंत खं.जाधव | Published: April 24, 2024 02:11 PM2024-04-24T14:11:44+5:302024-04-24T14:14:34+5:30
सावंतवाडी : कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी ...
सावंतवाडी : कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी वृत्तीने सावंतवाडीतील कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी अनेक उपक्रम राबविले आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानने या कारागृहाच्या अनेक विभागांच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून दिल्याने या कारागृहाचे रूप पालटून या कारागृहाला झळाळी प्राप्त झाली आहे. या कारागृहाचे पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम यांची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांनी याबाबत कारागृहाचे अधीक्षक संदीप एकशिंगे यांच्याकडे या कारागृहाच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर कारागृहाच्या मागणीनुसार कारागृह परिसराच्या रंगकामासाठी लागलेला रंग सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने या कारागृहाला भेट स्वरूपात देण्यात आला.सिंधुमित्र प्रतिष्ठानने दिलेल्या रंगातून कारागृहातील पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम, मुख्य प्रवेशद्वार परिसराची रंगरंगोटी करण्यात आली. कारागृहातील छोटेखानी पाटेकर देवालयाची रंगरंगोटी करून ते आकर्षक सजविण्यात आले.
सुशोभीकरणामुळे कारागृहाचा हा परिसर प्रसन्न आणि आनंददायी बनला आहे. कारागृह अधीक्षक संदीप एकशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून बंदीवानांच्या हितासाठी आवश्यक त्या नियमानुसार देय असलेल्या वस्तूंचा मोफत पुरवठा तसेच अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जात असल्याचे सांगितले. तसेच तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.