कुडाळ येथे आजपासून सिंधुसरस प्रदर्शन
By admin | Published: February 11, 2015 11:07 PM2015-02-11T23:07:22+5:302015-02-12T00:39:17+5:30
सुनील रेडकर : जिल्ह्यातील १५६ बचतगटांचे ९५ स्टॉल
कुडाळ : कुडाळ एसटी डेपो मैदानावर गुरुवारपासून शासनामार्फत घेण्यात येणारे ‘सिंधुसरस’ प्रदर्शन सुरू होत असून, या प्रदर्शनात जिल्ह्यातील १५६ बचतगटांचे विविध उत्पादनांचे ९५ स्टॉल असणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक सुनील रेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचे आयोजन १२ ते १६ फेबु्रवारी या कालावधीत केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन १२ फेबु्रवारी रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व विषय सभापती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आदी उपस्थित राहणार आहेत.
शासनातर्फे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसहायता गट, स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. तसेच त्यांना व्यवसायासाठी व्याज अनुदान व कर्जही उपलब्ध करून देण्यात येते. सद्यस्थितीत या स्वरोजगारींनी तयार केलेल्या वस्तंूना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक झाले आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री व प्रदर्शनासाठी विभागीय व जिल्हास्तरावर दरवर्षी प्रदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्घाटन सोहळ्यामध्ये सन २०१३-१४, २०१४-१५ या वर्षातील तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील रेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे विनायक पिंगुळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मदन भिसे व अधिकारी उपस्थित होते. या विक्री व प्रदर्शनात विविध स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. यामध्ये १२ रोजी सायंकाळी ६ ते ७ गणेश वंदना नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मृणाल व अनुष्का सावंत तसेच बॅ. नाथ पै हायस्कूलचे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत. ७ ते ९ या वेळेत दशावतारी नाटक होणार आहे.
१३ रोजी ६ ते ७ या वेळेत केसरकर मित्रमंडळ, माणगाव यांच्यावतीने मैदानी खेळ व योगासन प्रात्यक्षिक, ७ ते ९.३० या वेळेत श्री देव भैरव महिला मंडळ, कुडाळ यांच्या फुगडीचा कार्यक्रम होणार आहे.
१४ रोजी सायंकाळी ७ ते ८ बॅ. नाथ पै महिला बीएड महाविद्यालय, महिला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आणि महिला अध्यापक विद्यालय, कुडाळ यांच्यावतीने नृत्य आणि नाटिका, ८ ते ९ या वेळेत नवजीवन मित्रमंडळ, कळसुली-हर्डी (ता. कणकवली) यांचे ‘गजानृत्य’ तसेच १५ रोजी सायंकाळी ६ ते ७ शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, ७ ते ९.३० साईकला मंच, कुडाळ यांचा ‘माँ तुझे सलाम’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा व वस्तू विक्री-प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा व आपल्या जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांच्यावतीने केले आहे. (प्रतिनिधी)
लाकडी खेळणी, काजू, कोकम...
कुडाळ येथील ‘सिंधुसरस’ प्रदर्शनामध्ये ९५ स्टॉल असून, त्यामध्ये सुमारे १५६ बचतगट सहभागी होणार आहेत. त्यामध्ये बांबू हस्तकला, लाकडी खेळणी, खाद्य पदार्थ, काजू, कोकम यासारख्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच शासकीय कार्यालये व बँकांसाठी १० स्टॉलची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.