गायन स्पर्धेत सिद्धी परब प्रथम
By admin | Published: January 22, 2015 11:20 PM2015-01-22T23:20:51+5:302015-01-23T00:46:04+5:30
बांदा येथे आयोजन : विवाहित महिलांचा सहभाग
बांदा : फाऊंडेशन फॉर एच. ई. सी. ए. व नट वाचनालय बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने विवाहीत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भावगीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सिद्धी विनायक परब यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत रिचा रितेश शिरोडकर (दोडामार्ग) व मिनाक्षी प्रकाश तेंडोलकर (बांदा) यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वंदना दिगंबर गायतोंडे आणि अनघा सुर्वे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी राजेंद्र सिंगबाळ, मानसी प्रभू, भास्कर पावसकर, महाबळेश्वर सामंत, प्रकाश तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेची सुरुवात अनघा सुर्वे यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या भा. रा. तांबे यांच्या भावगीताने झाली. त्यानंतर सिद्धी परब यांनी ‘नयन तुज साठी’, रिचा शिरोडकर यांनी ‘जय शारदे वागेश्वरी’, गायत्री भांगले यांनी ‘एका तळ्यात होती’, वंदना गायतोंडे यांनी ‘उंच उंच माझा झोका’, शुभेच्छा सावंत यांनी ‘विसरु नको श्रीरामा मला’, मिनाक्षी तेंडोलकर यांनी ‘सजल नयन’ हे गीत सादर केले.विजेत्या स्पर्धकांना गोवा येथील प्रसिद्ध बासरीवादक राजेंद्र सिंगबाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला तबला साथ साईश दलाल यांनी तर हार्मोनियम साथ राजेंद्र सिंगबाळ व महेंद्र मांजरेकर यांनी दिली. स्पर्धेचे परिक्षण मानसी प्रभू व सुप्रिया सिंगबाळ यांनी केले.यावेळी बोलताना सुभाष मोर्ये यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तेंडोलकर यांनी केले. (प्रतिनिधी)