कणकवली तालुक्यात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:41 PM2019-11-15T12:41:13+5:302019-11-15T12:44:00+5:30

महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ? याबरोबरच आपल्याला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता लवकर होणार का? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडलेला आहे. वाढत्या महागाईने जीव मेटाकुटीस आलेला असताना माय बाप सरकार तरी काही करील का? याची वाट बघितली जात आहे. या समस्या कमी की काय असे वाटत असताना कणकवली तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर ' रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता ' हेच समजून येत नाही. अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.

 The situation in Kankavali taluka is 'Road to pit or road to pit'! | कणकवली तालुक्यात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती !

कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी रस्ते खड्डेमय बनले आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवली तालुक्यात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती !रस्ते धोकादायक ; ग्रामस्थामधून व्यक्त केला जातोय संताप व्यक्त

सुधीर राणे

कणकवली : महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ? याबरोबरच आपल्याला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता लवकर होणार का? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडलेला आहे. वाढत्या महागाईने जीव मेटाकुटीस आलेला असताना माय बाप सरकार तरी काही करील का? याची वाट बघितली जात आहे. या समस्या कमी की काय असे वाटत असताना कणकवली तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर ' रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता ' हेच समजून येत नाही. अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.

शहरातील रस्त्यांबरोबरच गावागावातील रस्त्याची स्थितीही बिकट आहे. कणकवली शहरातुन कनेडी मार्गे नरडवे येथे जाणारा रस्ता, कासार्डे पियाळी- वाघेरी मार्गे फोंडा रस्ता, हुंबरट तिठा ते करूळ मार्गे फोंडा रस्ता, हळवल - शिरवल कडे जाणारा रस्ता तर सातरल, कासरल, वरवडे, बिडवाडी ,साकेडी , वाघेरी या गावांबरोबरच खारेपाटण, तळेरे परिसरातील गावातील रस्ते असे किती तरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक रस्त्याची परिस्थिती पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जायबंदी होत आहेत. तर काहीजण मृत्यूमुखींही पडले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

जनतेतून या समस्येबाबत उठाव झाला आणि आंदोलन झाले की , प्रशासकीय यंत्रणा जागी होते. त्यानंतर काम हाती घेतले जाते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मे महिना उजाडतो. पावसाळा सुरू झाला की केलेला रस्ता वाहून जातो अथवा रस्त्यावर मोठे खड्डे तरी पडतात.

रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून ठेकेदारापर्यंत कार्यारंभ आदेश पोहचेपर्यंत अनेकवेळा एप्रिल - मे महिनाही उजाडत असतो. त्यामुळे अत्यन्त कमी वेळात काम पूर्ण केले जाते . त्याचा दर्जा चांगला नसल्याने पुन्हा महिनाभरात खड्डे पडतात. कामाचा दर्जा चांगला नसण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र, जनतेचा पैसे वाया जातो आणि जनतेलाच खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.

प्रमुख शहरांसह महामार्गाची अवस्था देखील अनेक ठिकाणी बिकट झाली आहे. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत काम करण्यात येत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत अशीच स्थिती कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. रस्ते बांधकामानंतर एक पाऊस देखील रस्ते पेलू शकले नसल्याचे अनेकवेळा दिसून येते.

रस्त्यांची बिकट अवस्था राज्यात चांगले कंत्राटदार नसल्यामुळे झाली आहे. राज्यातील हजारो किलोमीटरचे रस्ते नव्याने करण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील १२ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यास तसेच ६७ हजार कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे.

येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जाणार असून, खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असल्याचे २०१७ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, तशी स्थिती काही सध्या दिसत नाही.

शहरांचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. रस्त्यांवरून होणारी वाहतूक ही सुरळीत आणि जास्त वेगाने होणे गरजेचे आहे. तर विकासाला गती मिळते. परंतु , सध्या रस्तेच खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे एकप्रकारे विकासाला खीळ बसत आहे. त्यातच रस्ते खड्डेमय असल्याने नियमित दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठ, मान, कंबरदुखी बरोबरच मणक्याचे आजार जडले आहेत.

त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

या समस्येतून सोडविणार कोण ?

कणकवली शहरा लगतच्या आचरे रस्त्याची अवस्था कायमच दयनीय असते. त्यामुळे ती अवस्था पाहता गावातील रस्त्यांना विचारतय कोण ? अस प्रश्न निर्माण होतो. परंतु तरीही लोकप्रतिनिधी गप्प आहेत. तर अधिकारी कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामे सुरू होतील . असे सांगत आहेत. यामुळे आम्हाला या जीवघेण्या समस्येतून सोडविणार कोण ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

महामार्गाची अवस्थाही तीच !

मुंबई -गोवा महामार्ग जीवघेणा झालेला असताना अपघात कमी व्हावेत म्हणून महामार्ग चौपदरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे अपघातांना सामोरे जावेच लागणार आहे.
 

संबधित ठेकेदारावर कडक कारवाई करा !
रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थच पुढाकार घेऊन खड्डे बुजवत आहेत. रस्त्याच्या कामाचा ठेका देताना ठेकेदाराला विशिष्ट कालावधीत देखभाल दुरुस्ती करण्याची मुदत दिलेली असते. या मुदतीत त्याने देखभाल दुरुस्ती केली नाही. तसेच रस्त्यावर खड्डे पडून अपघात झाला . एखाद्याचा त्यामध्ये प्राण गेला तर त्या घटनेला संबधित ठेकेदारच कारणीभूत असल्याचे ठरवून त्याच्यावर कडक कारवाई करावी . म्हणजे ठेकेदार आपले काम व्यवस्थित करेल.
---- संतोष सावंत,
नागरीक .

Web Title:  The situation in Kankavali taluka is 'Road to pit or road to pit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.