खारेपाटण आरोग्य केंद्राची दुरवस्था
By admin | Published: August 19, 2015 09:43 PM2015-08-19T21:43:02+5:302015-08-19T21:43:02+5:30
कर्मचारी निवासस्थानाला गळती : रुग्णांची संख्या जास्त; मात्र डॉक्टर नाहीत
संतोष पाटणकर - खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या व मुंबई-गोवा महामार्गानजीक असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या दयनीय अवस्था असून, कर्मचाऱ्यांची कमतरता व कर्मचाऱ्यांच्या निवास संकुलाची झालेली दयनीय अवस्था यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्रात एकूण पाच शिपाई मंजूर असून, सध्या फक्त दोनच शिपाई कार्यरत आहेत. त्यामध्ये एक महिला व पुरुष शिपाई आहेत. यामुळे दिवसा एक शिपाई व रात्री एक शिपाई असे काम करावे लागत असल्यामुळे कधी कधी रात्रपाळीत काम करण्यासाठी महिला शिपायाला वेळप्रसंगी काम करावे लागत आहे. सध्या असलेल्या तीन शिपायांपैकी एक महिला परिचर आॅक्टोबर महिन्यात निवृत्त होणार आहे. मात्र, ही परिचर महिला शिल्लक राहिलेल्या रजेवर गेल्यामुळे उर्वरित दोन शिपाई कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. तर यापूर्वीचे दोन शिपाई प्रशासकीय बदलीत दुसरीकडे गेल्यामुळे कामाचा अधिक ताण या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गाला लागून असल्यामुळे येथे रात्री अपरात्री केव्हाही अपघात होण्याची दाट शक्यता असते. मात्र, खारेपाटण येथे एकही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाही. सध्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात डॉ. मंडावरे हे वैद्यकीय अधिकारी काम करीत असून सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. डेगवेकर रुग्णांची सेवा करीत आहेत. परंतु, प्रत्येकवेळी कॉन्ट्रॅक्ट बेसवर डॉक्टरांची पदे भरून खारेपाटणवर नेहमी अन्याय केला जात आहे. पूर्ण वेळ एमबीबीएस पदवी असलेले वैद्यकीय अधिकारी येथे भरण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत रुग्णकल्याण समितीच्यावतीनेही वेळोवेळी डॉक्टर मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या १२ गावांना या रुग्णालयाचा फायदा होत असून याव्यतिरिक्त देवगड तालुक्यातील कोर्ले, मुटाट, मणचे, धालवली, कुणकवण, उंडील, मालपे, वैभववाडी तालुक्यातील तिथवली, उंबर्डे, कोळपे, तर राजापूर तालुक्यातील पन्हाळे, मोसम, केळवली, मोरोशी, आदी भागांतील रुग्ण या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असतात. तसेच लॅब टेक्निशियन पद हे तात्पुरते ११ महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर भरले जात असून येथे रक्त, लघवी, थुंकी तपासली जाते. परंतु, कायमस्वरूपी नेमणूक दिल्यास रुग्णांना बाहेर तपासण्या करण्यासाठी येणारा खर्च यामुळे वाचू शकतो.
येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर असून वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ व वाहनचालक यांच्या निवासाची दयनीय अवस्था झाली असून, इमारतीला तडे गेले असून सिमेंटचे खपले खाली पडत आहेत. तसेच पूर्णत: गळती होऊन आतील भाग नेहमी ओलसर राहत आहे.
लाईट फिटिंग नादुरुस्त असून लिकेज इमारतीतील लाईट फिटिंगला हात लावणेसुद्धा धोकादायक झाले आहे. यामुळे भविष्यात एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी आरोग्य खात्याला कळवूनसुद्धा दखल घेत नसल्याची खंत येथील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली. एकीकडे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे, असे सांगितले जात असतानाच दुसरीकडे मात्र त्यांच्या निवास व्यवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे?
तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी असणारे शेडही दुरुस्तीला आली असून त्याच्यावरचे पत्रे तुटले आहेत. विविध समस्यांनी ग्रासलेल्या या आरोग्य केंद्रात दररोज असणारी रुग्णांची संख्या सुद्धा भरमसाठ असून दर दिवशी सुमारे १०० च्या वर बाह्यरुग्णांची तपासणी केली जात आहे.
याबाबत येथील कर्मचारीवर्गाचे काम निश्चित गौरवास पात्र आहे. परंतु, जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी तासन्तास रुग्णांच्या नातेवाइकांना वाट पाहावी लागते. कारण ‘कटर’ येथे उपलब्ध नाही. तसेच एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे जोपर्यंत या दोन्ही व्यक्ती येत नाहीत, तोपर्यंत शवविच्छेदन होत नाही. जे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयास पात्र ठरावे, अशा खारेपाटण प्राथमिक आरोग्य
केंद्रात ही समस्या कायम भेडसावणे योग्य नाही.
वरिष्ठांनी वेळीच दखल घ्यावी
एकंदरीत खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्या अशाच राहिल्यास रुग्णांचा वाढता ओढा असलेले हे रुग्णालय रुग्णांनी पाठ फिरविल्यास कायमचे सलाईनवर जाईल. याची दखल आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे काळाची गरज आहे.