गुजरातमधील सहा हायस्पीड ट्रॉलर्स पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 03:35 PM2019-10-17T15:35:49+5:302019-10-17T15:38:55+5:30
मालवण : जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरू ...
मालवण : जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरू ठेवली असून बुधवारी येथील मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने सुमारे २० ते २१ वाव समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना आढळलेले गुजरातमधील सहा ट्रॉलर्स पकडले. हे सर्व ट्रॉलर्स येथील बंदरात आणण्यात आले आहेत.
या ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली असून गुरुवारी सकाळी या मासळीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांनी दिली.
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मासळीची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने मच्छिमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यात गेल्या महिनाभरात अवैधरित्या मासेमारी करणारे आठहून अधिक ट्रॉलर्स पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हायस्पीड ट्रॉलर्स पकडले जात असतानाही परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच राहिल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
येथील समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असल्याने बुधवारी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांच्यासह सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, पोलीस कर्मचारी पावसकर, खोत, तांडेल, नारायण हरचकर, अंकुश तोरसकर, राकेश नाटेकर यांचे पथक गस्तीनौकेद्वारे गस्त घालत असताना त्यांना २० वाव समुद्रात अनेक परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे दिसून आले. या पथकाने कारवाई करीत गुजरातमधील सहा ट्रॉलर्स पकडले.
यात मनसुख बाबूभाई भेंसाला यांच्या मालकीचा रुद्र गंगा आयएनडी जीजे-११ एमएम-२७५२, ईश्वर देवजी भेंसाला यांच्या मालकीचा श्री साई आयएनडी जीजे-११ एमएम-७३०६, कानजी शामजी डालकी यांच्या मालकीचा गंगा सागर आयएनडी जीजे-११-एमएम ८०१०, राधाबेन कृष्णचंद्र भेंसाला यांच्या मालकीचा शशी भूषण आयएनडी जीजे-११-एमएम-१२१४७, जयाबेन रमेशभाई फोफंदी यांच्या मालकीचा भक्ती पूजा आयएनडी जीजे-११-एमएम-३१९९, चेतनभाई कोटीया यांच्या मालकीचा भोला रैनू आयएनडी जीजे-११-१२७३५ हे सहा ट्रॉलर्स पकडून ते येथील बंदरात आणण्यात आले आहेत.
यापुढेही धडक कारवाई सुरूच ठेवणार
या सहाही हायस्पीड ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली आहे. गुरुवारी सकाळी या मासळीचा बंदरात लिलाव केला जाणार आहे. लिलावानंतर या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईसाठीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांनी दिली.
महिला मत्स्य परवाना अधिकाऱ्याने केलेल्या या कारवाईचे मच्छिमारांकडून कौतुक होत आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून आले आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.