सहा लाखांची दारु जप्त, दोघांना अटक : वैभववाडीजवळील करुळ नाक्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:12 PM2019-10-01T15:12:57+5:302019-10-01T15:14:29+5:30
गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसमध्ये ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन चालकांसह दारु व बस ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. निवडणूक पथक आणि पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतरची तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
वैभववाडी : गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसमध्ये ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन चालकांसह दारु व बस ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. निवडणूक पथक आणि पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतरची तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी पोलिसांनी बस चालक अफजल हुसेन सय्यद (४३, रा. सातारा, महाबळेश्वर), व शमशाद इद्रीश खान (४८, रा.ताडदेव, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर करुळ तपासणी नाक्यावर निवडणूक विभागामार्फत नेमलेल्या विशेष पथकामार्फत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
गुरुवारी रात्री पोलीस नाईक कृष्णांत पाटील, पोलीस नाईक रवींद्र देवरुखकर, सर्वेक्षण पथकाचे अमोल पाटेकर, प्रकाश लांबोरे, संतोष साटम, अविनाश पाटील हे पथक तपासणी नाक्यावर होते. ते ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका कंपनीची ह्यव्होल्वोह्ण बस (क्रमांक- एआर-११; ए-७५६७) ही नाक्यावर आली. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी बस चालक अफजल हुसेन सय्यद याला बसमधील प्रवासी सामान ठेवण्याची जागा उघडून दाखविण्यास सांगितले. त्यानुसार सय्यद याने सामान ठेवण्याचा कप्पा उघडला असता त्यामध्ये खोके असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
चालकाकडे पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्याने बाथरुम क्लिनर असल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी एक खोका उघडून पाहिला तेव्हा त्या खोक्यामध्ये दारुच्या बाटल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किमंतीची दारु आणि १४ लाख रुपये किंमतीची ह्यव्होल्वोह्ण बस असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी मुद्देमालासह दोघांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली. त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.