धनादेश अनादरप्रकरणी सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:40 PM2019-12-25T15:40:00+5:302019-12-25T15:40:54+5:30
धनादेश अनादर प्रकरणी तळवडे येथील अमोल रमेश गावडे (२८) याला वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सहा महिने कारावास, ५ हजार रुपये दंड तसेच तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे.
वेंगुर्ला : धनादेश अनादर प्रकरणी तळवडे येथील अमोल रमेश गावडे (२८) याला वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सहा महिने कारावास, ५ हजार रुपये दंड तसेच तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे.
अमोल गावडे याने तक्रारदार भगवान सुधाकर तांडेल यांना तळवडे येथे दहा गुंठे जमीन खरेदी करून देतो असे सांगून त्यांच्यासोबत जमिनीसंदर्भात करार केला होता. तसेच तांडेल यांच्याकडून जमीन खरेदी करून देण्याच्या मोबदल्यात आगावू पैसेदेखील घेतले होते.
परंतु पैसे देऊनही तो जमीन खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तांडेल यांनी आपली रक्कम परत मागितली असता गावडे याने २४ सप्टेंबर २०१५ रोजी दोन लाखांचा धनादेश वितरीत केला होता.
हा धनादेश तांडेल यांनी आपल्या बँकेत सादर केला असता गावडे याच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरीत झाला होता. याबाबत तांडेल यांनी वेंगुर्ला न्यायालयात गावडे याच्या विरुध्द फौजदारी केस दाखल केली होती व त्याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयात दाखल केले हाते.
तक्रारदार पक्षाच्यावतीने वकिलांनी सादर केलेले पुरावे व तांडेल यांची मांडलेली बाजू ग्राह्य धरून वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअंती आरोपी अमोल गावडे याला सहा महिन्यांचा कारावास, ५ हजार रुपये दंड व तांडेल यांना नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी तांडेल यांच्यावतीने अॅड. बापू गव्हाणकर व अॅड. मनीष सातार्डेकर यांनी काम पाहिले.