जिल्ह्यातील सहा तहसीलदारांना शासकीय गाडीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:19 PM2022-01-29T15:19:55+5:302022-01-29T15:20:35+5:30
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना ...
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तालुक्याच्या शासकीय कामावर होत आहे. तरी शासनाने सहाही ठिकाणी तत्काळ शासकीय गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आधार फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्लेचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे तसेच योगेश तेली यांनी निवासी उपजिल्हाधकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे याबाबत लेखी निवेदनाद्वारे दिले आहे.
८ तालुक्यापैकी एकाच तालुक्याच्या तहसिलदारांना शासकीय गाडी सदयस्थितीत उपलब्ध आहे. परंतू उर्वरीत वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तहसिलदार, वैभववाडी यांच्याकडे जूनी गाडी उपलब्ध असून लवकरच ती गाडी निर्लेखित होणार आहे असे समजते.
जिल्हयाच्या नियोजन विभागाकडे केंद्रसरकार तसेच राज्यसरकारकडून विकास कामासाठी मोठया प्रमाणात भरघोस निधी येत असून शासकीय कार्यालयांना सुध्दा मोठया प्रमाणात शासकीय निधी येत असतो. गेल्या ४-५ वर्षामध्ये जिल्हयातील सर्व तहसिलदारांनी सातत्याने वारंवार लेखी व तोंडी मागणी करून सुध्दा शासकीय गाडी न दिल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे.
आणीबाणीच्या काळात तसेच सध्याच्या आपत्कालीन प्रसंगाना तोंड देण्यासाठी २४ तास शासकीय गाडी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना अत्यावश्यक असतानाही या सुविधेपासून वंचित तहसीलदारांना तात्काळ शासकीय गाडी मिळावी यासाठी वेंगुर्ले मधील जागरूक नागरिकांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.