देवगडात एकाच दिवशी सहा कासवे सापडली, जाळ्यात अडकल्याने चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 04:28 PM2020-07-08T16:28:06+5:302020-07-08T16:32:27+5:30
देवगड बीच, तारामुंबरी व कुणकेश्वर या ठिकाणी एकाच दिवशी सहा कासवे सापडली आहेत. यातील चार कासवे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देवगड : देवगड बीच, तारामुंबरी व कुणकेश्वर या ठिकाणी एकाच दिवशी सहा कासवे सापडली आहेत. यातील चार कासवे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देवगड तालुक्यातील देवगड, तारामुंबरी व कुणकेश्वर या किनारपट्टी भागात सोमवारी मच्छिमारांना सहा कासवे जाळ्यात अडकलेल्या स्थितीत सापडली. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास कुणकेश्वर मंदिरानजीक आॅलिव्ह रिडले जातीचे कासव जखमी अवस्थेत सापडले. सागरसुरक्षा रक्षक अमित बांदकर, अभिषेक कोयंडे, जीवरक्षक भुजबळ यांनी माहिती दिल्यानंतर तारामुंबरी येथील गोविंद खवळे, अक्षय खवळे, दीपक खवळे यांनी कासवाची सुटका केली. मात्र, कासवाचा पुढील पाय नसल्याचे दिसले. तारामुंबरी येथे आणून त्या कासवावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी उपचार केले.
देवगड बीचवरही महेश सागवेकर, पप्पू कदम, अवी खडपकर, अमित सकपाळ, निलेश सावंत, अमोल तेली, यशवंत भोवर यांना जखमी अवस्थेत कासव आढळले. त्या कासवाला सर्वांनी जाळे कापून जीवदान दिले. या कासवाचा पुढील पाय कापला गेला होता तर मागील पायाला जखम झाली होती. या कासवावरही उपचार करण्यात आले.
सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मच्छिमार हरम यांना तारामुंबरी येथे दोन कासवे जाळ्यात अडकलेली दिसली. त्यांनी तत्काळ तारामुंबरी येथील निसर्गप्रेमी युवकांना संपर्क साधला. यावेळी हितेश खवळे, अक्षय खवळे, ज्ञानेश्वर सारंग, दीपक खवळे यांनी धाव घेऊन जाळ्यात अडकलेल्या दोन्ही कासवांना जीवदान दिले.
एका कासवाचा पुढील पाय नव्हता व दुसऱ्या पायाला जखम झाली होती. दुसऱ्या कासवाचा पुढील पाय कातरलेला होता. या कासवांवरही उपचार करण्यात आले. जखमी कासवे तारामुंबरी येथील भैरवनाथ बचतगटाच्या मत्स्यपालन प्रकल्पात ठेवण्यात आली असून ती बरी झाल्यानंतर पाण्यात सोडण्यात येणार आहेत.
जखमी कासवांवर उपचार करण्यासाठी पालघर, डहाणू धर्तीवर जिल्ह्यात रुग्णालय व्हावे अशी मागणी लक्ष्मण तारी यांनी कांदळवन विभाग मुंबई व वनविभाग सिंधुदूर्ग यांच्याकडे केली आहे. तसेच देवगडमधील स्थानिक निसर्गप्रेमी मंडळींना जीव संवर्धन व त्यांच्या उपचारासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे अशीही मागणी केली आहे.