‘महिला, बाल विकास’च्या योजनांवर संशय
By admin | Published: July 5, 2017 12:21 AM2017-07-05T00:21:09+5:302017-07-05T00:21:09+5:30
‘महिला, बाल विकास’च्या योजनांवर संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत लाखो रुपये निधी खर्च करून विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली जातात. मात्र, या प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात किती महिलांना लाभ झाला. स्वत:चा व्यवसाय किती महिलांनी सुरु केला? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित करत महिला व बाल विकास विभागाच्या प्रशिक्षण योजनांवर संशय व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, समिती सदस्या माधवी बांदेकर, श्वेता कोरगांवकर, राजलक्ष्मी डिचवलकर, संपदा देसाई, अनुप्रिती खोचरे, उन्नती धुरी, पल्लवी झिमाळ, तालुका बाल प्रकल्प अधिकारी, अधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांच्या प्रशिक्षणावर बजेटच्या ५० टक्के एवढा निधी खर्च केला जातो. त्यामध्ये कराटे, परिचारिका, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनर, सेल्सगर्ल, एमएससीआयटी आदि प्रकारची विविध प्रशिक्षणे दिली जातात.
तीन ते सहा महिने कालावधीच्या प्रशिक्षाणांसाठी लाभार्थीची निवड केली जाते. अशा प्रकारचे दरवर्षी पाचशेहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले जाते. या प्रशिक्षणावर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या प्रशिक्षणाचा लाभ किती महिलांना झाला? किती महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. अशी विचारणा सभेत सदस्यांनी करत या विभागाच्या एकूणच प्रशिक्षण योजनेवर संशय व्यक्त केला आहे. तर दिलेल्या प्रशिक्षणाचा महिलांना लाभ झालाच पाहिजे त्यांना रोजगार मिळालेच पाहिजे अशा प्रकारची प्रशिक्षणे देण्यात यावीत. केवळ निधी खर्चासाठी प्रशिक्षणे नको अशा सूचना यावेळी सदस्यांनी केल्या.
महिलांना फळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण देण्याची सूचना करत या विभागाच्या मागील योजना पुन्हा राबविण्यास मान्यता दिली. महिलांना घर बसल्या उत्पन्न मिळावे यासाठी कुक्कुटपालन योजना राबविण्याचा ठराव सभेत घेतला.
यावेळी ही योजना आपल्याकडे नाही परंतु शासनाने ही योजना महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात मान्यता दिल्यास ती राबविण्यात येईल असे सोमनाथ रसाळ यांनी स्पष्ट केले.
अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे योजनेअंतर्गत विविध साहित्य पुरविण्यात येत आहे. मात्र, या योजनेत समविष्ट करण्यात आलेल्या टॅब ला सभापतींसह सर्वच सदस्यांनी कडाडून विरोध केला. तसेच या टॅब ऐवजी अंगणवाड्यांना अत्यावश्यक ते साहित्य पुरविण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या.
असे असतानाही बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी टॅबसाठी आग्रह धरला. परंतु, सदस्यांनी टॅब वितरणाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत नामंजूर केला.
अभिनंदन ठरावास सभापतींनी केला विरोध
मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन थेट खात्यात जमा होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय युती सरकारने घेतल्यामुळे शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजप जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांनी सभागृहात मंजुरीसाठी ठेवला. मात्र, सभापती सायली सावंत यांनी या ठरावास विरोध दर्शवत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आधी मानधन जमा होऊ देत मग अभिनंदनाच्या ठरावाचे बघू असे सांगितले.