वर्षभरात विनापरवाना १० हजार झाडांची कत्तल
By admin | Published: January 7, 2016 11:55 PM2016-01-07T23:55:12+5:302016-01-08T01:02:22+5:30
वनविभाग : प्राण्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्नही ऐरणीवर
रत्नागिरी : जिल्ह्यात राजरोसपणे अवैधरित्या जंगलतोड सुरू असून, वर्षभरात विनापरवाना ९७०३ झाडे तोडल्याची नोंद वन विभागाकडे आहे. जंगलतोड करणाऱ्यांकडून वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख १४ हजार ६५० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बेसुमार लाकूडतोड होत असल्याने डोंगर ओसाड होत आहेत. त्याचा गंभीर परिणाम वातावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. जंगलतोड होत असल्याने जंगली प्राणी लोकवस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्याच्या शोधात बिबटे व अन्य प्राणी लोकवस्तीत शिरत असल्याने त्यांच्या अस्तित्त्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या अवैधरित्या वृक्षतोडीकडे वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येत आहे. वनविभागाच्या आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जंगल भागाचा दौरा करण्याचा निर्णयही घेतला होता. अवैधरित्या सुरु असलेली जंगलतोड रोखण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी फिरती करण्यात येत असली तरी जंगलतोडीचे प्रमाण कमी झालेले नाही. विभागीय वन अधिकाऱ्यांकडून विनापरवाना वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस फिरते पथकही ठेवण्यात आले आहे. वर्षभराच्या कालावधीत जानेवारी २०१५पासून चिपळूण वन विभागाने विनापरवाना वृक्षतोडप्रकरणी दंडात्मक कारवाई करून ४ लाख १४ हजार इतका दंड वसूल केला आहे.वर्षभराच्या कालावधीत ९७०३ झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आली. त्यामध्ये चिपळुणात ३८६१, गुहागर ९५, दापोली ५२५, खेड ६४६, मंडणगड २०१, राजापूर १६२८, लांजा १५५६, संगमेश्वर ५७० आणि रत्नागिरीतील ६२१ झाडांचा समावेश आहे. ही विनापरवाना वृक्षतोड वन विभागाने कागदोपत्री नोंद केली असली तरी प्रत्यक्ष बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या २८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)
वृक्षतोड अधिनियम : तालुकावार कारवाई
अवैध जंगलतोड करताना आढळून आलेल्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड (विनियमन) अधिनियम १९६४ सुधारणा १९८९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या अधिनियमाप्रमाणे सन २०१५ या वर्षभरात २८१ विनापरवाना वृक्षतोड प्रकरणे आहेत.
तालुकावसूल दंड
चिपळूण९१५००
गुहागर ६२५०
दापोली५५८००
खेड५५२००
मंडणगड१२३००
राजापूर५६०५०
लांजा६१२००
संगमेश्वर४२९५०
रत्नागिरी३३४००
एकूण४१४६५०
तालुकाप्रकरणे
चिपळूण३९
गुहागर३
दापोली२९
खेड१४
मंडणगड९३
राजापूर३०
लांजा३१
संगमेश्वर२२
रत्नागिरी२०
निसर्गप्रेमींची खंत
रत्नागिरी जिल्ह्यात वृक्षाखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गप्रेमींकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.