कणकवली: पुतळा स्थलांतरण मुद्दयावरून नगरपंचायत सभेत घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 05:42 PM2022-08-08T17:42:46+5:302022-08-08T17:43:19+5:30
सलग आठ सभांना मुख्याधिकारी अनुपस्थित
कणकवली : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या महिन्यात स्थलांतरण झाला होता. याबाबत नगरसेवक ॲड. विराज भोसले यांनी नरपंचायत प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. दरम्यान सलग आठ सभांना मुख्याधिकारी अनुपस्थित राहत असल्याबद्दल विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी नाराजी व्यक्त केली.
कणकवली नगरपंचायतची सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवारी झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह ॲड. विराज भोसले, अभिजित मुसळे, अबिद नाईक, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, उर्मी जाधव, कविता राणे, प्रतीक्षा सावंत आदी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीलाच नगरसेवक अॅड. विराज भोसले यांनी पुतळा स्थलांतरण प्रश्नी नगरपंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यानंतर अभिजित मुसळे यांच्यासह सत्ताधारी नगसेवकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत सभागृह निनादून सोडले. याच मुद्दयावर विरोधी पक्ष नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पुतळा स्थलांतर प्रश्नी नगरपंचायतीने राबविलेल्या सर्व प्रक्रियेची माहिती द्या अशी मागणी सभागृहात केली.
पारकर यांच्या प्रश्नावर बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणाबाबतची सर्व माहिती ही माहिती अधिकारामध्ये मागितलेली आहे. सर्व माहिती तयार ठेवण्यात आली आहे. पुढील एक दोन दिवसांत मुख्याधिकारी हजर होतील. त्यानंतर रीतसर पैसे भरून सर्व माहिती घ्या असे स्पष्ट केले.
दरम्यान सलग आठ बैठकांना मुख्याधिकारी उपस्थित राहिलेले नाहीत याबाबत पारकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावर उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी मुख्याधिकारी नसले तरी विकासकामे थांबलेली नाहीत, असा मुद्दा मांडला. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येत्या आठ दिवसांत आपापल्या प्रभागातील विकासकामांची यादी आमच्याकडे द्या. मंत्रीमंडळ विस्तार होताच नगरपंचायतीची सर्व कामे पूर्ण होतील. असा विश्वास व्यक्त केला.