हळव्या भाताचा हळुवार दिलासा
By Admin | Published: September 5, 2015 11:52 PM2015-09-05T23:52:51+5:302015-09-05T23:54:23+5:30
पाऊस नाही तरीही... : भात पसवण्यास प्रारंभ, शेतकऱ्यांना आशेचा किरण
रत्नागिरी : ऊन्हामुळे हळवे भात पसविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. हळवे, निमगरवे, गरवे प्रकारचे भात लावण्यात येते. निमगरवे, गरव्या प्रकारचे भात तयार होण्यास अजून विलंब असला तरी हळवे भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे.
सुरूवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पेरण्या लवकर पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतर पावसाची हजेरी टप्याटप्याने झाल्यामुळे भात लागवड प्रक्रिया रेंगाळली. जुलै अखेरीपर्यंत भात लागवड सुरू होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर भात लागवड पूर्ण केली होती. मात्र भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे लागवड झालेल्या भाताला फुटवे कमी फुटले. पाण्याअभावी भातपीक तयार होण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली.
काही ठिकाणी तर भातावर करपा रोग पडला, शिवाय वाढ खुंटली. त्याचप्रमाणे खोडकिडा, निळे भुंगेरे, काटेरी भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला. वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यात आले.
हळव्या जातीचे भात पसविणे सुरू झाले आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाची सर आवश्यक आहे. निमगरव्या व गरव्या जातीच्या भातासाठी देखील पाऊस आवश्यक आहे. गेले चार दिवस पुन्हा एकदा पावसाने उसंत घेतली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस लागतो. त्यानंतर पाऊस निरोप घेत असल्यामुळे भात पिकाची उत्पादकता घटण्याचा धोका आहे.
पावसाअभावी २५ ते ३५ टक्केनी भात उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. भात खाचरे कोरडी असल्यामुळे भात वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाताबरोबर नागली तसेच इतर तृणधान्य, कडधान्य, वेलवर्गिय भाज्या यांच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. भात पसविताना जास्त पावसाची गरज आहे. गणेशोत्सवात पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यामुळे पसविलेल्या भाताला जास्त पावसाचा धोका संभवू शकतो. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झाल्यास नुकसानही संभावते. (प्रतिनिधी)