हळबे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट

By admin | Published: June 10, 2016 11:40 PM2016-06-10T23:40:42+5:302016-06-11T00:50:51+5:30

दोडामार्गमधील हेल्पलाईन ग्रुपकडून प्राचार्य धारेवर : निधी परताव्याच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित

Smash students from Halbe College | हळबे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट

हळबे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट

Next

दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती स्वयंनिर्भर निधीच्या नावाखाली प्रत्येकी चारशे रूपये घेण्यात येत आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप करत हेल्पलाईन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाला धडक देत प्रभारी प्राचार्यांना धारेवर धरले. ही लूट त्वरीत थांबवावी आणि जमा केलेली रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्रा. दिलीप बर्वे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. ए. पाटील रजेवर आहेत. ते बुधवारी आल्यानंतर निर्णय देतील, असे सांगितल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्गात आहे. या महाविद्यालयात दरवर्षी सुमारे ३०० विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, प्रत्येक वर्षी प्रवेश घेताना युवती स्वयं निर्भर निधीच्या नावाखाली प्रत्येकी २० रूपयांच्या ४० पावत्यांचे पावतीपुस्तक देऊन चारशे रूपये घेतले जातात. ते जर दिले नाहीत, तर प्रवेश दिला जात नाही. ही अट नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याबरोबरच प्रथम व द्वितीय वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी लावली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबतची तक्रार काही विद्यार्थ्यांनी तालुक्यातील हेल्पलाईन ग्रुपच्या कानावर घातल्यावर या ग्रुपचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, शैलेश गावडे, वैभव इनामदार, नारायण गावडे आदींनी सामाजिक कार्यकर्ते व माटणे पंचक्रोशी सरपंच संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव, नगरसेवक चेतन चव्हाण यांना घेऊन महाविद्यालयावर धडक दिली. यावेळी प्रा. पाटील रजेवर असल्याने अनुपस्थित होते. तर प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा. दिलीप बर्वे हे कार्यभार सांभाळत होते. यावेळी विद्यार्थ्यांना सोबत घेत हेल्पलाईन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक बर्वे यांना घेराव घालून याचा जाब विचारला. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी पावती पुस्तकाचे चारशे रूपये न दिल्याने आमचे प्रथम वर्षाचे गुणपत्रक दिले नाही. शिवाय पुढील वर्गात प्रवेशही दिला जात नाही, असे सांगितले.
त्यामुुळे आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी याबाबत बर्वे यांना धारेवर धरत याचा जाब विचारला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून चारशे रूपये घेतले जात असल्याचे मान्य केले. मात्र, हा निर्णय आमचा नसून प्राचार्य व्ही. ए. पाटील यांचा आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून प्रा. पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाबाबत कल्पना दिली. त्यांनी दूरध्वनीवरून बर्वे यांच्याशी चर्चा केल्यावर यापुढे चारशे रूपये घेतले जाणार नाही.
तसेच कोणाचाही प्रवेश व गुणपत्रक अडविले जाणार नाही, असे सांगितले. मात्र, हे लेखी द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी बर्वे यांच्याकडे केल्यावर त्यांनी माझ्याकडे तोंडी चार्ज देण्यात आला आहे. लेखी स्वरूपात नाही. त्यामुळे प्राचार्य बुधवारी महाविद्यालयात आल्यावर यासंदर्भात निर्णय देतील, असे सांगितले. त्यानंतर तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)


संगणक कक्षातील संगणक गायब
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगणक कक्षातील संगणक गायब असल्याची तक्रार हेल्पलाईन गु्रपच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी कळणे येथील समृध्दा रिसोर्सेस या मायनिंग कंपनीने विद्यार्थ्यांसाठी २५ संगणक महाविद्यालयाकडे दिल्याचे समजल्यानंतर संगणक कक्षाची पाहणी केली. यावेळी एकही संगणक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हे संगणक गेले तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


स्थानिक समिती करतेय काय ?
महाविद्यालयात प्रवेशावेळी प्रत्येकी ४०० रूपये घेऊन विद्यार्थ्यांची लूट चालवली जात असताना स्थानिक समिती मात्र गप्प का? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना स्थानिक समितीचे पदाधिकारी मात्र काहीच बोलत नसल्याने समिती महाविद्यालयीन प्रशासनाची धार्जिणी असल्याचा आरोपही करण्यात आला.

Web Title: Smash students from Halbe College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.