Sindhudurg: मांडवी एक्स्प्रेसमधून आगीसह धुरांचे लोट, जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या उड्या
By अनंत खं.जाधव | Published: November 1, 2023 01:44 PM2023-11-01T13:44:08+5:302023-11-01T13:44:59+5:30
सावंतवाडी रेल्वे स्थानकात द बर्निग ट्रेनचा थरार
सावंतवाडी : मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेसमधून सावंतवाडीरेल्वे स्थानकात द बर्निग ट्रेन चा थरार अनुभवायला मिळाला. रेल्वेच्या बोगीमधून आगीसह धुराचे लोट पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या घटनेनंतर रेल्वे थांबवून पाणी मारून तसेच अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीचे कारण समजू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे घडल्याची शक्यता आहे. ही घटना आज, बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मात्र प्रवाशात एकच खळबळ उडाली. अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्या.
मडगाव येथून मुंबईच्या दिशेने सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. सावंतवाडी स्थानक पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दिव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. यामुळे सावंतवाडी स्थानकावर रेल्वेगाडी थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचार्यांनी स्थानकावरील अधिकार्यांना आगीबाबत माहिती दिली.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. उपस्थित कर्मचार्यांनाही आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.