बंधारा फुटून देवबागमध्ये समुद्राचे पाणी घुसले
By admin | Published: June 19, 2015 11:42 PM2015-06-19T23:42:55+5:302015-06-19T23:42:55+5:30
अजस्त्र लाटांचा तडाखा : घाटात दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्गनगरी : मालवण किनारपट्टीवर अजस्त्र लाटांनी शुक्रवारी देवबाग येथील बंधारा उद्ध्वस्त करत गावात प्रवेश केला. यामुळे मालवण किनारपट्टीच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यांचा फटका वाडा, तांबळडेग व जामसंडे गावांना बसला असून, नुकसानीच्या घटना घडल्या. करूळ आणि भुईबावडा घाटात दरडींची पडझड सुरूच आहे. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती.
मालवण तालुक्यातील देवबाग, तोंडवळी, तळाशील या किनारपट्टीवरील गावांना अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवबाग ख्रिश्चनवाडी येथे दुपारी लाटांनी बंधारा पार करून गावात प्रवेश केला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लाटांनी जमीन पोटात घेतल्याने बंधारा खिळखिळा झाला. मसुरे, आचरा, डांगमोडे, कालावल, खोतजुवा, काळसे या खाडीपट्ट्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. देवबाग, तोंडवळी, तळाशील या सागरी अतिक्रमणग्रस्त गावांना समुद्राच्या लाटांनी दणका दिला. गेली २० वर्षे मागणी करूनही देवबाग-मोबारवाडी येथे २०० मीटरचा बंधारा न घातल्याने समुद्राच्या लाटा या भागात घुसल्या. मालवण तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यासह दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती. मालवण पोलीस वसाहतीनजीकही लाटांचे पाणी घुसले. बंदर विभागाने तीन क्रमांकाचा बावटा फडकावून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
गगनबावडा मार्ग ठप्प
वादळी पावसामुळे सकाळी वैभववाडी ऐनारी फाट्यानजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे तीन तास खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. स्थानिक शेतकऱ्यांनी कोसळलेले झाड हटवून सकाळी ११ नंतर मार्ग खुला केला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतूक वैभववाडीमार्गे वळविण्यात आली होती.
देवगड किनारपट्टीला तडाखा
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका वाडा, तांबळडेग व जामसंडे गावांना बसला असून, काही घरांची किरकोळ स्वरूपाची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, समुद्रामध्ये उधाण परिस्थिती निर्माण होऊन समुद्राच्या महाकाय लाटा तांबळडेग किनारी धडकत आहेत. यामुळे पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)