Sindhudurg: कुणकेरी येथील जंगलात माडाच्या पानांची तस्करी, तिघेजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:30 PM2024-02-14T12:30:16+5:302024-02-14T12:30:30+5:30
वनविभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई
सावंतवाडी : वन हद्दीत येऊन भेडले माडाच्या पानांची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने उत्तर प्रदेश येथील तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सकाळी कुणकेरी येथील जंगलात करण्यात आली आहे.
या प्रकरणी नईम सलमानी (२७), अनिल भार्गव (२१) आणि रिजवान सलमानी (२५, तिघे ही राहणार उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहे. दरम्यान या तिघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर त्यांच्या टीमसह जंगल तपासणी करीत असताना जंगलामध्ये जागोजागी भेडल्या माड झाडांची तोड करून पाने गोळा करत असल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात व्यक्ती जंगलामध्ये विळ्याच्या साहाय्याने भेडल्या माडाची तोड करून, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले.
फिरते पथक वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, दत्तात्रय शिंदे, धनंजय यादव यांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या यातील तीनही आरोपींची सखोल चौकशी केली असता हे आरोपी परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींच्या सोबतच दोन दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात आल्या. या आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. वैभव चव्हाण यांनी तर वन विभागाच्यावतीने वनक्षेत्रपाल फिरते पथक मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला. ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक सावंतवाडीच्यावतीने करण्यात आली आहे.