होडावडात ‘खवल्या’ची तस्करी

By admin | Published: January 18, 2017 12:02 AM2017-01-18T00:02:13+5:302017-01-18T00:02:13+5:30

होमगार्ड ताब्यात : वनविभागाकडून आणखी पाचजणांची नावे निष्पन्न

Smuggling of 'scam' in Hoogavad | होडावडात ‘खवल्या’ची तस्करी

होडावडात ‘खवल्या’ची तस्करी

Next



कुडाळ : तस्करीच्या उद्देशाने होडावडा (ता. वेंगुर्ले) येथील घरात बंदिस्त ठेवण्यात आलेले खवले मांजर उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून, पोलिसांनी होमगार्डच्या सेवेत असलेल्या परशुराम गोविंद पार्सेकर याला ताब्यात घेतले आहे. या खवले मांजराची किंमत बाजारभावाने एक लाख रुपये आहे. पोलिसांनी कारवाईनंतर खवले मांजरासह आरोपी वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. वनविभागाच्या चौकशीत या प्रकरणात आणखी पाचजणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
कुडाळ वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, १६ जानेवारी रोजी रात्री सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे जाऊन परशुराम पार्सेकर यांच्या घराची तपासणी केली असता घरात बंदिस्त अवस्थेत खवले मांजर आढळून आले. पार्सेकर यांची चौकशी करून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व खवले मांजरासह आरोपीला सावंतवाडी उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले. तेथे याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने रात्री उशिरा खवले मांजरासह आरोपीला ताब्यात घेतले.
त्यानंतर मंगळवारी दिवसभर संशयित आरोपी परशुराम पार्सेकर याची वनविभागाने कसून चौकशी केली. यात आरोपीने १३ जानेवारी रोजी आपल्याच काजूच्या बागेत त्या खवले मांजराला पकडल्याची माहिती दिली. बरेच दिवस या बागेत हे मांजर येत होते, असे त्याने सांगितले. त्यानंतर पाळत ठेवून संतोष पेडणेकर व रॉली डिसोजा यांच्या सहकार्याने हे मांजर पकडण्यात आले. त्यानंतर गेले चार दिवस ते मी पिंजऱ्यात बंदिस्त ठेवून ग्राहकांचा शोध घेत होतो, असे त्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
आरोपी पार्सेकर याने वनविभागाला दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने खवले मांजराची विक्री करण्यासाठी तसेच त्याला पकडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले. यात संतोष पेडणेकर (रा. होडावडा सुभाषवाडी), रॉली फ्रॅन्सिस डिसोजा (रा. होडावडा सुभाषवाडी), बाबू तांबोसकर (रा. होडावडा), जयप्रकाश तिरोडकर (रा. मळेवाड), गावडे (पूर्ण नाव समजू शकले नाही, मळेवाड) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी विविध कलमांखाली परशुराम पार्सेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी परशुराम पार्सेकर हा गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असल्याचे तपासात पुढे आले असून, इतर आरोपींची वनविभाग माहिती घेत आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल एल. एम. पडकील, जी. आर. दुधवडकर, डी. बी. वसावे, ए. एस. सावंत, पी. एस. चव्हाण यांनी केली आहे. वनविभागाच्यावतीने वनपाल रामचंद्र मडवळ, विनोद मयेकर, वनरक्षक विष्णू नरळे, सूर्यकांत सावंत, सायली कांबळे, सदानंद परब हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
खरेदीसाठी मुंबईची पार्टी
संशयिताने १३ जानेवारी रोजी हे मांजर पकडले होते. या मांजराच्या खरेदीसाठी मुंबईहून पार्टी येणार असल्याची माहितीही वन विभागाला मिळाली आहे. शिवाय हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी करणारे असल्याची शक्यता आहे.
या खवल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत होत असल्याने संशयिताला या मांजर तस्करीतून
किमान एक लाख रुपये मिळण्याची शक्यता होती.
यापूर्वी वाडोस
येथे कारवाई
यापूर्वी वाडोस येथेही खवले मांजराच्या खवल्यांची विक्री केल्याप्रकरणी संशयितांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १७५ खवले जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जिवंत खवले मांजरच सापडल्याने येथे रॅकेट कार्यरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यानुसार या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आवाहन वनविभागासह पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Web Title: Smuggling of 'scam' in Hoogavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.