नरेंद्र डोंगरातून सागवान चोरीला, वन विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:31 PM2019-06-24T13:31:32+5:302019-06-24T13:32:50+5:30
सह्याद्रीच्या कॉरिडोअरमधील १६०० हेक्टर जमिनीत वृक्षतोड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात सागाची तोड झाल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. तब्बल साठ ते सत्तर लाख रूपयांची सागवानाची झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणचे साग तोडण्यात आले आहेत, त्यांचे बुंधे मात्र नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या- येणाऱ्यांना दिसत असून, वन विभाग मात्र नरेंद्र डोंगराच्या नूतनीकरणात गुंतले आहे. मात्र, आपल्या मालमत्तेवर पुरता दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडी : सह्याद्रीच्या कॉरिडोअरमधील १६०० हेक्टर जमिनीत वृक्षतोड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात सागाची तोड झाल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. तब्बल साठ ते सत्तर लाख रूपयांची सागवानाची झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणचे साग तोडण्यात आले आहेत, त्यांचे बुंधे मात्र नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या- येणाऱ्यांना दिसत असून, वन विभाग मात्र नरेंद्र डोंगराच्या नूतनीकरणात गुंतले आहे. मात्र, आपल्या मालमत्तेवर पुरता दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन विभागाच्या पदराआडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. मात्र, वन विभाग आपल्या साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष करीत वन विभागाच्या हद्दीत बांधकामे करण्यात गुंतले आहे. मध्यंतरी सह्याद्रीच्या कॉरिडोओरमधील १६०० हेक्टर जमिनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे प्रकरण स्वयंसेवी संस्थेने उघडकीस आणले होते. याचे पुरावेही उच्च न्यायालयात देण्यात आले आहेत. याची चौकशीही सुरू आहे. मात्र, एवढी मोठी वृक्षतोड होऊनसुध्दा वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करताना दिसत आहेत.
वन विभागाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर नरेंद्र डोंगर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वन विभागाची साधनसंपत्ती आहे. वेगवेगळ््या प्रकारची झाडे आहेत. मात्र, याकडे लक्ष देण्यास वन विभागाला वेळ नाही. वन विभाग नरेंद्र डोगरांवर लाईटिंग करत आहे. मात्र, हे करत असताना वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा डोळा चुकवून सागवानाची तब्बल ३४ झाडे परस्पर तोडून नेण्यात आली आहेत.
या सागवानाची बाजारभावाने किंमत पन्नास ते साठ लाख रूपये होत आहे. एवढ्या मोठ्या किंमतीची सागवानाची तोड होऊनही वन विभागाचे अधिकारी या सर्व प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. नरेंद्र डोंगर हा सर्व बाजंूनी वन विभागाच्या ताब्यात आहे. अनेक वन कर्मचारी तेथे देखरेखीसाठी असतात. असे असतानाही सागवानाची झाडे तोडण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही झाडे तोडत असताना चोरट्यांनी झाडांचे बुंधे मात्र जागेवर ठेवले आहेत. ही तोड साधारणत: वर्षभरातील असावी, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सर्व झाडांची वये पूर्ण होत आली होती. त्यामुळे त्यांची किंमत बाजारपेठेत मोठी येईल, यात शंकाच नाही.
ही सागवानाची झाडे तोडण्यात आल्यानंतर चोरट्यांनी आपली चोरी लपविण्यासाठी सागवानाच्या झाडांच्या बुंध्यांवर पाळापाचोळा टाकला आहे. त्यामुळे ही तोड पटकन कोणाच्याही लक्षात येत नाही. मात्र, वन विभागाने या सर्वाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात बांधकामात आपला लक्ष घातल्याने बेसुमार जंगल तोड सध्या होत असल्याचे सांगण्यात येत आहे.