स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम

By admin | Published: January 24, 2017 12:59 AM2017-01-24T00:59:51+5:302017-01-24T00:59:51+5:30

जिल्हा परिषद सदस्या : अविश्वास, अपमानामुळे निर्णय; ‘नजरकैदेत’ ठेवल्याच्या आरोपाने खळबळ

Snehlata Chorgan's Congress RR Ram | स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम

स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम

Next



वैभववाडी : काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चोरगे यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय प्रक्रियेत डावलून अविश्वास दाखवत सातत्याने अपमान केला. हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडे गेल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करतानाच नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला नेतृत्वाने संपूर्ण रात्र 'नजरकैदेत' ठेवले होते असा खळबळजनक आरोप स्नेहलता चोरगे यांनी केला आहे.
स्नेहलता चोरगे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्याकडे दिल्यानंतर निवासस्थानी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. चोरगे पुढे म्हणाल्या की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून गेल्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली. निवडून आल्यापासून मी पक्षाचे प्रामाणिक काम केले. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी सतत खोटे-नाटे सांगून माझ्याविषयी मत बिघडविण्याचे काम केले. तरीही स्थानिकांचा विरोध डावलून राणेंनी मला सभापतीपद दिले. त्याबद्दल आम्ही कुटुंबिय त्यांचे ऋणी आहोत.
चोरगे पुढे म्हणाल्या की, मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात, तालुक्यात मंजूर करुन आणलेल्या विकास कामांपैकी एकही काम आपण किंवा आपल्या कुटुंबातील कुणीही केलेले नाही. इतकेच काय तर त्या कामांचे श्रेयही कुणी दिले नाही. ती कामे करणारे निराळेच आहेत असा टोला त्यांनी लगावला. मी पक्षाचे काम प्रामाणिक केले की नाही हे जनतेला माहीत आहे. परंतु, आपल्या बाबतीत नेहमीच अविश्वासाचे वातावरण निर्माण केले गेले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही असा आरोपही चोरगे यांनी केला.
रविवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात आमदार नीतेश राणे येणार आहेत. तुम्ही ५ वाजता पक्ष कार्यालयात या. असे पहिल्यांदा पंचायत समितीतून सांगितले गेले. त्यानंतर महिला अध्यक्षानी सांगितले. परंतु, कोकिसरे मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत कुणीही कल्पना दिली नव्हती. त्या मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी असूनसुद्धा तेथील उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले गेले नाही. किंबहुना याबाबत माहितीच दिली नाही. त्यामुळे आमदार राणे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष साठे यांच्यात व आपल्यात शाब्दिक खटके उडाले. मात्र, माझी बाजू ऐकून घेण्याऐवजी आमदार राणे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या समोर मला अपमानीत केले. त्यामुळे जिथे आपला मान राखला जात नाही. तिथे न थांबण्याचा निर्णय घेऊन पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचे किंवा काय करायचे याबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्नेहलता चोरगे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नगरपंचायतीच्यावेळी रात्रभर नजरकैदेत ठेवले
गेली ४३ वर्षे आमच्या कुटुंबाचे वैभववाडी शहरात वास्तव्य आहे. शिवाय मी पक्षाची लोकप्रतिनिधी असताना नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला विश्वासात घेतले नाही. तरीही नारायण राणे यांना आम्ही मानत असल्याने अपमान सहन करुन कुणालाही न सांगता मी व माझे पती प्रचारात सहभागी झालो. मात्र, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकून महिला लोकप्रतिनिधी असूनही मतदानाच्या आदल्या रात्री मला रात्रभर नजरकैदेत ठेवले होते, असा खळबळजनक आरोप स्नेहलता चोरगे यांनी केला. खरंतर त्याचवेळी राजीनामा देण्याचा विचार केला होता. परंतु, नारायण राणे यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सगळे सहन केले. परंतु आता सगळंच सहनशीलतेच्या पलिकडे गेले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Snehlata Chorgan's Congress RR Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.