..म्हणून दीपक केसरकर राणेंचे गोडवे गातायत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे टीकास्त्र
By अनंत खं.जाधव | Published: January 19, 2023 04:22 PM2023-01-19T16:22:57+5:302023-01-19T16:23:44+5:30
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळला जात आहे.
सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जीवावर आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक केसरकर यांनी त्यांना नरकासुर, राणेंनी दहशतवाद जिल्ह्यात आणला, राक्षस, लोकांची कुंकू पुसली अशा वेगवेगळ्या उपाधी दिल्या. अन् तेच केसरकर आता राणेंचे गोडवे गात आहेत. केसरकरांची पाऊले भाजपच्या दिशेने पडायला लागली असून त्यांचा लोकसभेचा प्रचार केल्यास आपला ते विधानसभेचा प्रचार करतील असे त्यांना वाटत असल्याची टिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, सायली दुभाषी, इफ्तिकार राजगुरू, संदिप राणे, नाना सावंत, राकेश नेवगी आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, आयत्यावेळी नारायण राणेंनी नकार दिला तर आपल्याला भाजपाची दारे बंद होवू शकतात, हे लक्षात आल्यामुळेच पुन्हा एकदा मंत्री केसरकर यांनी आपला “ढोंगीपणा” सुरू केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे आपल्या कामापुरती तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असाच आहे. दोन वेळा मंत्रीपद असतानाही त्यांना आपल्या मतदार संघाचा विकास करायला जमला नाही. येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळला जात आहे.
तर दुसरीकडे चष्म्याचा कारखाना, एक लाख सेटटॉप बॉक्स, सिक्युरीटी गार्ड ट्रेनिंग सेंटर ही सर्व आश्वासने हवेत विरली आहे. त्यांना सर्वसामान्य मतदारांचे काहीएक पडलेले नाही. फक्त स्वार्थ साधून स्वतःची तुंबडी भरुन घ्यायची, असा एक वचनी कार्यक्रम त्यांच्याकडुन सुरू आहे.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला मुद्दा केवळ केसरकरांच्या वेळ काढू पणा मुळे राहिला. तो सुटणे गरजेचे होते. तर अशा लोकांच्या प्रश्नासाठी अण्णा केसरकरांसारखी जेष्ठ व्यक्ती आत्मदहनाचा निर्णय घेते हे योग्य नाही. मंत्रीपदात एकही मोठा प्रकल्प करता आला नाही हेच दुर्देव आहे. त्यामुळे आता जनतेने सावध व्हावे. मी मंत्री असतना अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले मग हे दोनदा मंत्री झाले त्यांना जिल्ह्याचा का विकास करता येत नाही असा सवाल देखील भोसले यांनी केला.