चला हवा येऊ द्या; ...म्हणून कॉमेडी किंग भाऊ कदमला देवेंद्र फडणवीसांचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 07:30 PM2019-12-09T19:30:12+5:302019-12-09T19:30:43+5:30
''चला हवा येऊ द्या''बद्दल सर्वच राजकीय पक्षांत कुतूहल असते.
- अनंत जाधव
सावंतवाडी : ''चला हवा येऊ द्या''बद्दल सर्वच राजकीय पक्षांत कुतूहल असते. एखाद्या राजकीय नेत्यावर विनोद केला तर ते त्याला खास अशी दाद देतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मी पुन्हा येईन, असे सांगून आम्हाला एक नवीन टॅगलाइन दिली आहे. त्यावर केलेल्या विनोदाला फडणवीस यांनी खास कलाकार भाऊ कदमचे फोन करून अभिनंदन केले आहे, अशी माहिती चला हवा येऊ द्याचे प्रमुख कलाकार अभिनेता डॉ. निलेश साबळे यांनी दिली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे निमंत्रण दिले आहे. पण मातोश्रीवर जायचे की वर्षा वर हे अद्याप ठरले नसल्याचेही साबळे यांनी सांगितले.
चला हवा येऊ द्याची टीम शनिवारी मुंबईहून गोव्याकडे जात असताना काही काळ त्यांनी कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील 'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर चित्रीकरण केले होते. त्यावेळी साबळे यांनी लोकमतशी खास संवाद साधला. चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम संपूर्ण जगात चांगलाच नावारूपास आला आहे. मध्यतंरी निवडणुकीच्या व नंतर सरकार स्थापन करण्याच्या धगाधगीच्या जीवनातही अनेक जण चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघत होते. यांची जराही टीआरपी कमी झाला नव्हता.
अनेक जण दिवसभर बातम्या बघत असत, पण नंतर चला हवा येऊ द्या बघितल्यानंतर त्यांना थोडसे हायसे वाटत होते. आम्ही अनेक राजकीय नेत्यांवर विनोद करत असतो. पण आतापर्यंत असे कधीही झाले नाही की एखाद्या राजकीय नेत्याने त्यावर आक्षेप घेतला. अनेक जणांनी तर आम्हाला फोन करू दाद दिली आहे. महाराष्ट्रातील हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार हे आमच्या मालिकेच्या सेटवर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात.
अमिताभ बच्चन असो अगर शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान यांनी तर एक नव्हे तर दोनदा आमच्या सेटवर येऊन आमच्या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.अनेक वेळा मराठीच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट अभिनेते कशासाठी असा प्रश्न येतो. पण आम्ही यावर कोणतेही भाष्य करत नाही. मराठीच्या सेटवर हिंदीचे कलाकार येतात म्हणजे नक्कीच आमच्यात काही तरी वेगळेपण आहे, हेच यातून दिसून येते, असेही साबळे यांनी सांगितले. अभिनेत्याप्रमाणेच राजकीय नेते ही आमचा कार्यक्रम आवर्जून बघतात.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मी चला हवा येऊ द्या कार्यक्रम बघितल्याशिवाय झोपतच नाही, असे आम्हाला एका कार्यक्रमात सांगितले होते. तसेच आमच्यातील कलाकारांनाही त्यांनी तुम्ही केलेले विनोद कसे चांगले आहेत, हे पटवूनही दिले होते, असे ही साबळे यांनी स्पष्ट केले. तसेच फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. त्यावर अभिनेता भाऊ कदम यांंनी केलेला विनोद फडणवीस यांना प्रचंड आवडला. त्यांचे फोन करून अभिनंदन केल्याचे साबळे यांनी सांगितले.
नव्या मुख्यमंत्र्यांनी चला हवा येऊ द्याच्या टीमला भेटण्यासाठी बोलावले आहे. पण कुठे भेटायचे हे त्यांनी अद्याप सांगितले. नाही तेही आमचा कार्यक्रम टीव्ही किंवा यू ट्युबवर बघतात, असे त्यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सगळे कलाकार हे प्रथमच भेटणार असून, वर्षा की मातोश्री हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
चला हवा येऊ द्या वर आता चित्रपट येणार
चला हवा येऊ द्या वर चित्रपट काढण्याबाबत आमचा विचार सुरू असून, आम्ही त्याबाबतची पटकथाही निमिर्त्यांना दिली आहे. मात्र चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद होणार नाही, असे साबळे यांनी सांगितले. तसेच चला हवा येऊ द्या हा चित्रपट पूर्णत: विनोदी असणार आहे, असेही साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण कुठे होणार हे निश्चित ठरले नाही. पण आमचे कोकणला प्राधान्य राहणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.