..तर जिल्ह्याचा विकास कसा करणार?, परशुराम उपरकरांचा दीपक केसरकरांना प्रश्न
By सुधीर राणे | Published: April 3, 2023 04:14 PM2023-04-03T16:14:18+5:302023-04-03T16:14:42+5:30
शिक्षण मंत्र्यांचे डीएड उमेदवारांच्या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष !
कणकवली : सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर जिल्ह्यातीलच स्थानिक डीएड व डीटीएड उमेदवारांना नियुक्त करावे. यासाठी गेले ६ दिवस डीएड झालेले विद्यार्थी ओरोस येथे उपोषणाला बसले आहेत. शिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री या जिल्ह्यातील असूनही त्यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुलांची नवीन पिढी घडवण्यासाठी अध्ययन केलेल्या उमेदवारांकडे जिल्ह्यातील या लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास वेळ नसेल तर ते जिल्ह्याचा विकास कसा करणार? असा सवाल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दया मेस्त्री उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी डीएड उमेदवारांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. परंतु ते सत्तेत असताना त्यांनी शिक्षकांचा प्रश्न उपस्थित का केला नाही? या उमेदवारांना आता तरी न्याय मिळणार का? डीएड पदवी घेऊनही शेकडो उमेदवार नोकरीपासून गेली बारा वर्षे वंचित आहेत. यापुर्वी शिक्षक भरती पदासाठी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न देता परप्रांतीय शिक्षकांची भरती केली त्यांची बोलीभाषा येथील मुलांना समजत नाही. तसेच ते काही वर्षानंतर बदली करून जिल्ह्याबाहेर जातात. त्यामुळे शिक्षकांची अनेक पदे रिक्त राहतात. जिल्ह्यातीलच उमेदवारांची या रिक्त पदांवर नियुक्ती केल्यास ते आनंदाने व उत्स्फूर्तपणे मुलांना शिक्षण देऊ शकतात. त्यामुळे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी जिल्ह्यातीलच डी एड उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
शिक्षक भरतीपासून ११ वर्षे वंचित राहिलेले उमेदवार गेली पाच वर्षे प्रत्येक २६ जानेवारी, १५ ऑगस्टला उपोषण करतात. तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देत आहेत. परंतु पालकमंत्र्यांनी त्या उमेदवारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. टीईटी परीक्षेचे केंद्र मुंबई, गोवा आणि कोल्हापूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एक परीक्षा देण्यासाठी किमान पाच ते सात हजार रुपये नोकरी मिळणार या आशेवर खर्च करावा लागत आहे. हा खर्च सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नसल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षेचे केंद्र जिल्ह्यातच सुरू करणे आवश्यक आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसेच्यावतीने पाठिंबा दिला आहे. मात्र, आम्ही यावरच शांत बसणार नसून यावर्षी जिल्ह्यात शिक्षक भरती लागली तर सन १९९०-९२ च्या भरतीप्रमाणे परप्रांतीय उमेदवारांना पळवून लावणार आहोत.
डीएड उमेदवारांच्या उपोषणाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर भेट देऊ शकत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. उपोषणकर्त्यांमध्ये काही विद्यार्थी हे त्यांच्या मतदारसंघातील असूनही मंत्री दीपक केसरकर जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर ते जिल्ह्याचा विकास कसा करतील? असा प्रश्नही उपरकर यांनी उपस्थित केला आहे.