..तर राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध; दांडी ते राजकोट किनारपट्टीवरील मच्छिमार आक्रमक
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 26, 2023 06:29 PM2023-10-26T18:29:11+5:302023-10-26T18:31:13+5:30
नौदल दिनाच्यानिमित्ताने येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणमध्ये येणार
मालवण (सिंधुदुर्ग) : नौदल दिनाच्यानिमित्ताने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणमध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव देशाच्या आणि जागतिक पातळीवर पोहोचणार असल्याने या दौऱ्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, या दौऱ्याचे कारण काढून प्रशासनाने राजकोट ते दांडी किनारपट्टीवरील ९९ बांधकामे पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. एका दिवसाच्या दौऱ्यासाठी आमची हजारो कुटुंबे विस्थापित करण्याचा घाट कोणी घालत असेल तर या दौऱ्याला आमचा विरोध राहणार असल्याची कडक भूमिका मालवणमधील श्रमीक मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केली आहे.
याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचे म्हणणे मांडणार आहोत. या अन्यायकारक नोटीशीविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची आमची तयारी आहे. वेळ पडल्यास साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
दांडी ते राजकोट किनारपट्टी वरील सुमारे ९९ अनधिकृत बांधकामे सात दिवसात हटविण्याचे आदेश महसूल प्रशासनाने एका नोटीशीव्दारे काढले आहेत. यामध्ये काही नियमीत बांधकामांचादेखील समावेश आहे. या निषेधार्थ गुरूवारी दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली.
यावेळी व्यासपिठावर मच्छीमार नेते दिलीप घारे, बाबला पिंटो, रूपेश प्रभू, विली डिसोजा उपस्थित होते. तसेच शक्ती नागवेकर, नरेश हुले, मारूती हुले, संतोष शिरगावकर, सुमित ताम्हणकर, गोपीनाथ तांडेल, जॉन्सन डायस, विवेक पारकर, फारूख अहमद, चिन्मय तांडेल, राजू कोयले, योगेश काळसेकर, विशाल जुवाटकर, कमलेश कोचरेकर, निकिता केळुसकर, प्रमोद खवणेकर, भूषण तोडणकर, चंद्रकांत प्रभू आदी उपस्थित होते.
स्थानिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र
पंतप्रधान मालवणमध्ये येत असल्याने अनेक सोयीसुविधा निर्माण होण्याच्या शक्यतेमध्ये आम्ही होतो. मात्र, ते बाजूलाच राहून स्थानिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र प्रशासकीय यंत्रणांकडून आखण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नसताना किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या रोजीरोटीच्या झोपड्या तोडण्याचे काम केले जात असेल तर आम्ही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून लढा उभा करू.
एका नोटीशीव्दारे व्यवसाय उध्वस्त करू देणार नाही
सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतानाही प्रशासनाकडून जबरदस्तीने आमचे व्यवसाय हटविण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे ? असा सवाल मच्छीमार प्रतिनिधींनी व्यक्त केला. पंतप्रधान देशातील तरूणांना रोजगार देण्याचे ध्येय ठेवत असताना युवकांनी उभा केलेला व्यवसाय तोडण्यासाठी शासन प्रयत्नशील का आहे ? पर्यटन आणि मच्छीमार व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली असून तो एका नोटीशीव्दारे हा व्यवसाय आपण कदापी उध्वस्त होवू देणार नाही.
..तर मच्छीमार असहकार्याची भूमिका घेणार
पंतप्रधानांच्या दौऱ्याआडून आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. आजपर्यंत आम्ही प्रशासकीय यंत्रणेला सहकार्याची भूमिका घेतली आहे. आता मात्र, शासन आमचा विचार करत नसेल तर आगामी काळात शासकीय यंत्रणेसाठी आमची असहकार्याची भूमिका असेल. शासन जबरदस्तीने आम्हाला विस्थापित करू शकत नाही.