..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:45 PM2022-06-25T17:45:50+5:302022-06-25T17:54:58+5:30

दरवेळी निवडणूक जवळ आली किंवा पक्षांतर करायचे असेल त्यावेळी केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात येते.

So take my security and give it to Deepak Kesarkar says MLA Vaibhav Naik | ..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक

..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक

googlenewsNext

कणकवली : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आपण दिले आहे. तसेच याकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी अशी देखील मागणी केली असल्याची माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली.

दरवेळी निवडणूक जवळ आली किंवा पक्षांतर करायचे असेल त्यावेळी केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात येते. तसे नेहमी केसरकर यांचे म्हणणे असते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शांत आहे. सध्याच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर किंवा अन्य ठिकाणी शिवसैनिकांनी कोणत्याही घोषणा दिलेल्या नाहीत. दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांना सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित का करावा लागतो? याचे आत्मचिंतन केसरकर यांनी करावे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना पाच वर्षे गृहराज्यमंत्री पद दिले होते. याचे भान केसरकरांनी बोलताना ठेवावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही सुरक्षा काढलेली नाही किंवा कुणाला सुरक्षा दिलेली नाही. राणेंचा दहशतवाद नेमका कोणी मोडून काढला आहे ते जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. झेंडे घ्यायला कार्यकर्ते नसताना राणे यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरली हे देखील माहिती आहे. अनेकदा केसरकर सांगत असतात की राणेंचा दहशतवाद मोडून काढला. पण खरा दहशतवाद कोणी मोडला हे शिवसैनिक व जनतेला माहिती आहे.

जीव धोक्यात घालून राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली

२००९ मध्ये माझा जीव धोक्यात घालून मी राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली. त्या वेळी मला ५० हजार मते मिळाली. दोन वेळा माझा जीव वाचला होता. राणेंच्या वीस - वीस गाड्या माझ्या पाठलागावर होत्या. मात्र याचा आम्ही केव्हा बाऊ केला नाही. मी माझे हे मोठेपण यापूर्वीही सांगितले नाही व यापुढेही सांगणार नाही. मात्र, आता प्रश्न उपस्थित झाला म्हणून सांगत आहे.      

म्हणून दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले

केसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही. मात्र, आता सरकार बदलते म्हटल्यानंतर ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले आहेत असा टोला नाईक यांनी लगावला.

Web Title: So take my security and give it to Deepak Kesarkar says MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.