फराळाला फोडणी महागाईची
By admin | Published: November 10, 2015 09:17 PM2015-11-10T21:17:54+5:302015-11-10T23:35:56+5:30
महागाईचा फटका : साखर, तेलाचे दर स्थिर; गृहिणींचे बजेट कोलमडले
रत्नागिरी : ऐन दीपावलीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला आहे. साखर, तेलाचे दर मात्र स्थिर राहिले असले तरी अन्य वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवानंतर महिनाभरात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. १५० ते १८० रूपये किलो दराने तूरडाळ विकली जात आहे. मूगडाळ १२० ते १३०, तर मसूरडाळ ९० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मूग ९२ ते ९६ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. चणा ६०, काबुली चणा ६५ ते ७०, चवळी ६० ते ७०, उडीद डाळ १४०, मटकी १०६, मसूर ८८, पोहे २५ ते २८, रवा ३० ते ३२ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खोबरे २०० ते २५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. १०६ ते ११० रुपये दराने शेंगदाण्याची विक्री सुरू आहे. बेसन ७८ रूपये, आटा २५ ते २८, गूळ ४० ते ४२, साखर २८ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.कांदा ३० ते ४०, बटाटा १६ ते २०, लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वसामान्यांना घेता यावा, असे अपेक्षित असताना दरवाढीमुळे आनंदावर विरजन पडत आहे. नोकरदार महिलांना सुट्या मिळत नसल्यामुळे तयार फराळास विशेष मागणी असते. दरवाढीमुळे रेडीमेड फराळाच्या किमतीतही दर वाढ झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असल्या तरी सर्वसामान्य ग्राहक खरेदीसाठी बजेट पाहून हात आखडता घेत आहेत. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी होती. काही ठराविक दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केली होती. बाजारात मंदी आल्याचे दिसत होते. सुटीच्या दिवशीही ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)
फराळाला कमी प्रतिसाद
ऐन दिवाळीच्या काळात महागाईच्या भडक्याचा त्रास गृहिणींना सहन करावा लागला. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात खरेदीसाठी तुरळक गर्दी केली होती. फराळासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींनी हात आखडता घेतला आहे. तसेच तयार फराळालादेखील कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला यावेळी अधिक पसंती होती.