आर्याकडून कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन

By admin | Published: May 16, 2016 12:26 AM2016-05-16T00:26:40+5:302016-05-16T00:27:31+5:30

बांदातील पहिलीच बालयुवा कीर्तनकार : सिंधुुदुर्ग, गोव्यात कार्यक्रम

Social awakening through Kirtana | आर्याकडून कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन

आर्याकडून कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन

Next

नीलेश मोरजकर / बांदा
कीर्तनातून मनाला व शरीराला आत्मिक समाधान मिळते, कीर्तनातून खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करता येते. मात्र कीर्तन संस्कृतीकडे आजच्या युवा पिढीचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने ही कला जोपासण्यासाठी या कलेचा विस्तार होणे ही काळाची गरज आहे. आज नावाजलेले कीर्तनकार कीर्तन कला जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील असताना बांदा शहरातील केवळ १२ वर्षांची असलेली बालयुवा कीर्तनकार आर्या मंगलदास साळगावकर हिने कीर्तन कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा हाती घेतला आहे. यासाठी तिला तिचे गुरुवर्य ह. भ. प. सुहास बुवा वझे व आई-वडिल यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
खेळण्या बागडण्याच्या वयात कीर्तन कलेत पारंगत असलेल्या व लीलया कीर्तन सादर करणाऱ्या आर्या हिचे आज सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. बांदा शहरातील आर्या ही पहिली बाल युवा किर्तनकार आहे. आतापर्यंत तिने सिंधुदुर्ग व गोवा राज्यात चक्री कीर्तनाचे ९ कार्यक्रम केले आहेत. तिची कीर्तन सादर करण्याची कला व कीर्तन कलेचा अभ्यास पाहिल्यास भविष्यात ती मोठी किर्तनकार म्हणून नावारुपास येईल हे निश्चित.
आर्या लहान असताना तिची आई तिला सांगली येथे कोटणीस महाराजांच्या किर्तनाला घेउन जायची. तेथेच तिला किर्तनाची आवड निर्माण झाली. तिच्यात किर्तनाची गोडी निर्माण झाल्याने ती नेहमी कोटणीस महाराजांचे कीर्तन ऐकू लागली. तिच्यातील किर्तनाची गोडी तिच्या आईने तेव्हाच हेरली होती. पाचवी इयत्तेत असताना तिने सावंतवाडी येथे गाण्याचा क्लास सुरु केला. त्यानंतर पेडणे-गोवा येथे गोमंतक संत मंडळ फोंडा संचलित भगवती कीर्तन विद्यालय सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्याच्या आई-वडिलांनी तिला वर्षभरापूर्वी या विद्यालयात दाखल केले. वर्षभरात तिने कीर्तन कला अगदी लीलया आत्मसात केली. आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी दोन तास ती कीर्तन विद्यालयात किर्तनाचे धडे घेत आहे.
आतापर्यंत आर्याने बांदा शहरात ३, पेडणे-गोवा येथील भगवती मंदिरात १, नवदुर्गा मंदिर मडकई येथे १, सातेरी मंदिर मांद्रे-गोवा येथे १, गोपाळ गणेश फार्मागुडी, फोंडा-गोवा येथे १, सिध्दिविनायक मंदिर कुर्टी, फोंडा, सिध्दिविनायक मंदिर कांदोळी येथे १ असे ९ चक्री किर्तनाचे कार्यक्रम केले आहेत.
कीर्तन सादर करताना संस्कृत सुभाषिते, भगवद्गीता, आरती, पौराणिक कथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, वेगवेगळे अभंग, संत वाड:मय या बाबींचा अभ्यास असावा लागतो. त्याचबरोबरच कीर्तन सादरीकरण करताना वक्तृत्व शैली देखिल किर्तनकाराला साजेशी असणे गरजेची आहे. या सर्व बाबी कीर्तन विद्यालयात आर्याने आत्मसात केल्या आहेत. त्याचबरोबर संगीतातील रस, गायनातील वेगवेगळे ताल, सूर, लय, राग देखिल तिने आत्मसात केले आहेत. किर्तनाचं सादरीकरण हे दोन तासांचे असते. पहिल्या तासातील पूर्वरंगात संतांच्या अभंगाचे विश्लेषण, ज्ञानेश्वरांची ओवी, श्लोक, उदाहरणे, समाजप्रबोधन, अखंड नामस्मरण, संस्कार यांचे सादरीकरण करण्यात येते. त्यानंतर आख्यान्यात पौराणिक किंवा एखादा सत्पुरुष, क्रांतिकारक यांच्या कथेचे सादरीकरण करण्यात येते. त्यासाठी वाचन, मनन व चिंतन गरजेचे आहे. या सर्वच पातळीवर आर्या उत्तम कामगिरी करीत आहे. यासाठी आर्या दररोज सायंकाळी एक तास सराव करते. आपल्याला कीर्तन कलेत परिपूर्ण व्हायचे असून यासाठी अजून शिकण्याची जिद्द असल्याचे ती सांगते.

Web Title: Social awakening through Kirtana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.