हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, रत्नागिरीत प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 04:16 PM2018-12-17T16:16:31+5:302018-12-17T16:19:00+5:30
सावंतवाडी : माणगाव (ता. कुडाळ) येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला आर्टस् सर्कल, रत्नागिरी यांच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता ...
सावंतवाडी : माणगाव (ता. कुडाळ) येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला आर्टस् सर्कल, रत्नागिरी यांच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला. आर्टस् सर्कल संस्थेचे व्यवस्थापक मनोज देसाई यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार संस्थेचे व्यवस्थापक एकनाथ सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आर्टस् सर्कलतर्फे पुलोत्सवांतर्गत हा पुरस्कार देण्यात आला.
कोकणात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांमधील इच्छुक दात्यांना संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी आर्टस् सर्कलतर्फे हा पुरस्कार दिला जातो. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मिती करून तरूणांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेच्या या विशेष कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी प्रकल्पाबाबत माहिती देताना एकनाथ सावंत म्हणाले, या प्रकल्पाची स्थापना १९८९ साली केशव बळिराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त करण्यात आली. सिंधुुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांमधून तरूणांनी उद्योग-व्यवसाय स्वत: निर्माण करावा आणि नोकरी-धंद्यानिमित्त गाव सोडून बाहेरगावी जाण्याऐवजी आपल्या मातीतच पैशाचे मळे फुलवावेत, या हेतूने संस्थेची निर्मिती झाली आहे.
जैविक शेती, ससे पालन गोपालन, फळ प्रक्रिया उद्योग, कंपोस्ट, गांडूळ खत निर्मिती, भाजीपाला उत्पादन या गोष्टींबरोबरच संगणक प्रशिक्षण आदी अभ्यासक्रमांची सेवा या संस्थेमार्फत दिली जाते. त्यामुळे असंख्य तरूणांना यापासून प्रेरणा मिळते, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समिती, माणगाव संचलित डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.