शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

By admin | Published: April 29, 2015 10:06 PM2015-04-29T22:06:07+5:302015-04-30T00:28:13+5:30

मृद् आरोग्य पत्रिका अभियान : मातीलाही द्यावी लागणार आता सुपिकतेची परीक्षा

Soil Health Card to be given to farmers | शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

Next

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --शेतकऱ्यांच्या शेतातील मातीपरीक्षण करुन त्याला आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपिकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्यांचा समतोलपणा टिकून रहाण्यास मदत होते. यासाठी महाराष्ट्र शासनाने मृद् आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार माती परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मृद् आरोग्य कार्ड देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील १५२५ गावातील शेतकऱ्यांच्या मातीची तपासणी केली जाणार आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ४० हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे. वर्षाला ५०० गावांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळेत ७ हजार ६०० नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे तर उर्वरित नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. दापोली, अर्बन बँक, सायन्स कॉलेज, दापोली, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, कृ षी विज्ञान केंद्र देवधे, अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज मांडकी, खरवते दहिवली कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्या केल्या जाणार आहेत.
शासनाकडून मृद् आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येणार असून २०१५ ते २०१८ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र तपासणी कार्ड वितरण केले जाणार आहे.
जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण तसेच दोष, जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन, जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, खतांची संतुलीत मात्रा, संतुलीत खताचा पुरवठा झाल्याने उत्पादन क्षमता टिकून रहाते. या बाबींची पुर्तता माती परीक्षणामुळे होत असल्याने शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळविण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामुल्य होणार असल्याने शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीची पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता कळून येण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ७० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे १ लाख ९६ हजार ५४०.४ मेट्रिक टन भाताचे उत्पादन होते़ नागली पिक दुय्यम पिक घेतले जाते. नागलीची लागवड १५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. इतर तृणधान्य १८३० हेक्टर, उडीद १८८ हेक्टर, तूर २८० हेक्टर, कडधान्यांमध्ये मूग १४ हेक्टर, भुईमूग ९ हेक्टर, तीळ ४१ हेक्टर, कारळा ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते.
कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा पिकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम विद्यापिठाने दिलेल्या सल्यानुसार दहा वर्षाचे आंब्याच्या झाड लावलेल्या मातीमध्ये १३८० ग्रॅम नत्र, ४८० ग्रॅम स्पुरद, ११६० ग्रॅम पालाशचे प्रमाण असणे आवश्यक आहे. तर भात लावलेल्या मातीमध्ये १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरत, ५० किलो पालाश असणे आवश्यक आहे.

उपयुक्त अभियान
मातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे खताचे डोस वाढविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने जमिनीची उत्पादकता वाढविणे, किंवा पोत सुधारण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे.



1अभियानातंर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश तपासणी केली जाणार आहे.
2सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, सोडीयम, कॅल्शियम, मेग्नेशिअम, मुक्त चुना, जलधारणा, माती घनता, पोत तपासली जाणार आहे.
3सूक्ष्म मुलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत मातीमधील तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Soil Health Card to be given to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.