कुडाळ शहरात घनकचऱ्याचा बोजवारा
By admin | Published: April 14, 2015 01:06 AM2015-04-14T01:06:01+5:302015-04-14T01:10:55+5:30
गंभीर समस्या : प्रशासनाकडून योग्य उपाययोजना नाहीत
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
कुडाळातील समस्यांबाबत विचार करताना पहिल्याप्रथम लक्ष जातो शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात बिघडलेल्या नियोजनाबाबत. झपाट्याने वाढणाऱ्या कुडाळ शहरामध्ये घनकचऱ्याचा बोजवाराही मोठ्या प्रमाणात वाढत असून कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही मात्र गंभीर शहराची गंभीर समस्या वाढत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मध्यवर्ती व सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा तालुका म्हणजे कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कुडाळ शहर हेही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात अग्रेसर असून या शहराची वाढही झपाट्याने होत चालली असताना येथील विविध प्रकारचे प्रश्नही झपाट्याने वाढत चालले आहेत.
सर्वात महत्त्वाची समस्या बनत चाललेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात येथील ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे हतबल आणि निष्क्रीय बनलेली आहे.
कुडाळ शहरात मोठी बाजारपेठ, मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, सर्वात जास्त दवाखाने, रेल्वेस्थानक, एसटी स्टॅण्ड, कॉम्प्लेक्स या सर्व गोष्टी असल्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात असून तालुक्याचे ठिकाण असल्याने इतर गावातील इथे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील विविध प्रकारच्या कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे.
मोठे व झपाट्याने वाढणाऱ्या कुडाळ शहराला सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत पूर्णपणे यशस्वी ठरत नाही. यामुळे येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही अपयशी ठरते.
फक्त सिंधुदुर्गातील नव्हे, तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठी म्हणजे १७ ग्रामपंचायत सदस्य असणारी ही कुडाळ ग्रामपंचायत आहे. यावरून शहराची व्याप्ती किती मोठी आहे, हे समजते. मात्र, या संपूर्ण शहरातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने फक्त १५ ते १६ कामगारांची नेमणूक केली असून हे सर्व कामगार या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतील काय, हा यक्ष प्रश्न पडतो.
कचरा उलचण्यासाठी कामगारांची संख्या कमी आहे. परंतु त्याहीपलीकडे पाहता, येथील कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर वाहनाचा उपयोग केला असून कचरा पूर्णपणे वाहून नेण्यासाठी योग्य प्रकारे वाहनाची इथे ग्रामपंचायतीने सोय केलेली दिसत नाही.
वास्तविक पाहता, एवढ्या मोठ्या शहरातील घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आवश्यक आहे. मात्र, याठिकाणी एकही घंटागाडी नसल्याने काही घरातील लोक कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीकडे न जाता परिसरातच इतरत्र कचरा टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढते. कचरा उचलून गाडीमध्ये भरण्यासाठी येथील कचरा उचलणाऱ्या कामगारांना ग्रामपंचायतीने योग्य प्रकारे साधने दिली नसल्याचे निदर्शनास येते. कारण त्यांच्या पायात मोठे गमबूट, हातात मोजे, नाकाला मास्क नसते. तसेच इतर आवश्यक साधनेही दिसत नाहीत.
बुधवार हा कुडाळचा आठवडा बाजार असून या आठवडा बाजारासाठी परजिल्ह्यातून, परराज्यातून अनेक छोटेमोठे भाजी विक्रेते येतात. ते रस्त्यावर मोठी दुकाने लावून भाजी विकतात. मात्र, जाताना भाजीचा कचरा तिथेच किंवा कचराकुंडीच्या बाहेर रस्त्यावर टाकून जातात. त्यामुळे गुरुवारी सकाळी रस्त्यावर कचराच कचरा दिसतो. शहरात ठेवलेल्या कचराकुंडीमधील कचरा पाहिला असता, या कचराकुंडीमध्ये असलेला कचरा न विघटन होणारा प्लास्टिकसारखा कचरा असतो. त्यामुळे येथील कचराकुंडीत सर्व प्रकारचा कचरा एकत्र मिळतो.
कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावून शहर स्वच्छ व निरोगी राखण्यासाठी कुडाळ ग्रामपंचायतीने किमान खालील गोष्टी करणे आवश्यक आहे. कचरा उचलण्यासाठी कामगारांची संख्या कंत्राटाने का होईना, पण वाढविली पाहिजे. कंत्राटी पध्दतीने कामगारांबरोबरच घंटागाडीही प्रत्येक वॉर्डमध्ये दिली पाहिजे. कचरा नेण्यासाठी असलेल्या ट्रॅक्टरबरोबर अजून गाडीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ओला कचरा वेगळा केल्यास त्याचे विघटन करणे सोपे होईल. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकसारखा कचरा वेगळा करून त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केल्यास चांगले होईल. कामगारांना बूट, मोजे, मास्क, टोपी तसेच इतर साधने पुरविणे आवश्यक आहे. कामगारांची आरोग्य तपासणी प्रत्येक महिन्यात करावी. कचराकुंडीतच कचरा टाकावा हा नियम येथील रहिवाशांनी पाळण्यासाठी कडक पावले उचलावीत. भाजी विक्रेते यांना कचरा रस्त्यावर न टाकता कचराकुंडीतच टाकावा. अन्यथा कारवाईचा बडगा उगारावा. शहरातील प्रत्येक कचराकुंडीतील कचरा किमान दोन दिवसात उचलला गेलाच पाहिजे, याकरिता प्रयत्न आवश्यक आहेत.