एसटी कामगारांच्या वेतनासह अन्य समस्या तत्काळ सोडवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 08:05 PM2020-11-02T20:05:33+5:302020-11-02T20:07:45+5:30
collector, statetransport, sindhudurg, एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ते सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ते सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर , विभागिय सचिव विनय राणे , विभागिय खनिजदार अनिल नर, रविंद्र भिसे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या आपत्ती काळात एस.टी. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत . तसेच सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतुकही अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत करीत आहेत . त्यामध्ये बरेच कर्मचारी बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत .
कोरोना कालावधीत कामगार प्रतिकुल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही . त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे .
शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे . परंतु एस.टी. कामगारांना तो अद्याप लागू केलेला नाही . त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव २ टक्क्यांची तीन महित्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्यांची नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एस.टी.कामगारांना अद्याप मिळालेली नाही . त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल लागू केलेली आहे . परंतु एस.टी.कामगारांना अद्यापर्यंत ती लागू केलेली नाही .
एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी कायद्याने एस.टी.प्रशासनाची असतानाही त्यांनी वेतन दिलेले नाही . त्यामुळे यापुढेही या मागण्या मान्य न झाल्यास एस.टी. कर्मचारी आपल्या रहात्या घरासमोर आपल्या कुटंबियांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी आक्रोश व्यक्त करतील . त्यामुळे एस.टी.कामगार व त्यांच्या कुटुंबियांची वेतनाविना होणारी उपासमार थांबविण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करावेत . असेही या निवेदनात म्हटले आहे.