राडा प्रकरणात आणखी काहींचा समावेश
By Admin | Published: October 1, 2016 11:41 PM2016-10-01T23:41:28+5:302016-10-02T00:16:43+5:30
बांदा येथे संपत्तीतून वाद : एकोणीस जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी
सावंतवाडी : संपत्तीच्या वादातून बांदा शहरातील कट्टा कार्नर येथे झालेल्या राड्यातील संशयित आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही संशयित आरोपी असून निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अब्दुलकादर खान याचे वर्तन तसेच आरोपींनी वापरलेली हत्यारे कुठून आणली, याची माहिती घ्यायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
बांदा कट्टा कॉर्नर येथे दोन गटांत धारदार शस्त्रांसह तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. पोलिसांनी आसिफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपींना शनिवारी सावंतवाडीतील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी पोलिसांच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी बाजू मांडताना घटनेची माहिती न्यायालयाला दिली. तसेच संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली.
यात आरोपी मुंबईचे असून, त्यांनी आणलेली हत्यारे कुठून आणली तसेच यामध्ये अन्य काही आरोपी आहेत का, याचीही चौकशी करणे बाकी आहे, असे सांगितले. तसेच मुख्य संशयित अब्दुलकादर खान हा मुंबई येथे सहाय्यक पोलिस आयुक्त होता. त्यामुळे त्याच्या वर्तनाची चौकशी करणे बाकी असल्याने पोलिस कोठडी हवी असल्याची मागणी केली.
मात्र, याला आरोपींचे वकील अॅड. अजित भणगे यांनी विरोध केला. सर्व आरोपी हजर झाले आहेत. हत्यारेही जमा केली असल्याने पोलिस कोठडी देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. बापू गव्हाणकर यांनीही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने आपले म्हणणे लेखी द्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)