भाजपात प्रवेशासाठी काहीजण इच्छुक
By admin | Published: November 4, 2015 10:37 PM2015-11-04T22:37:17+5:302015-11-04T23:59:05+5:30
काका कु डाळकर : काँग्रेसच्या विभागीय उपाध्यक्षाचा प्रवेश
कुडाळ : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुडाळ विभागीय उपाध्यक्ष सदानंद अणावकर यांनी भाजप पक्षात अधिकृत प्रवेश केला असून, अजूनही काहीजण लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे पदाधिकारी व नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत करीत कुडाळ नगर पंचायतीवर भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलताना ते म्हणाले की, कुडाळ काँगे्रेसचे विभागीय उपाध्यक्ष सदानंद अणावकर हे गेल्यावेळी कुडाळ ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस तिकिटावर उभे राहण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट न देता नेमळेकर यांना तिकीट दिले. तसेच पक्षश्रेष्ठीही त्यांची दखल घेत नसल्याने ते नाराज होते.
त्यांनी कुडाळ येथे झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांची कार्य करण्याची पद्धत पाहता भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी त्यांची भाजपच्या कुडाळ शहर उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. विरोधी पक्षात बरेच नाराज असून, ते गेले काही दिवस आमच्या संपर्कात आहेत. तेही येत्या काही दिवसात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट काका कुडाळकर यांनी केला.
तसेच कुडाळकर म्हणाले की, दोडामार्ग व वैभववाडी नगरपंचायतीमध्ये युतीचे यश पाहता एका वर्षात भाजप शिवसेना निवडणुका जिंकू शकतात, हे सिध्द झाले आहे. कारण यापूर्वी सर्वजण मोदीलाट असल्याचे म्हणायचे. नगरपंचायतीच्या या विजयामुळे कार्यकर्त्यात उत्साह वाढला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या वरही भाजपाचा झेंडा फडकाविण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल सुरू केली आहे. आम्हीही कुडाळचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ते म्हणाले. नगरखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे त्याचाही फायदा कुडाळ नगरपंचायतीला निश्चितच होणार आहे. (प्रतिनिधी)
राज्यनाट्य स्पर्धा कुडाळात
महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यनाट्य स्पर्धा पुढच्यावर्षी कुडाळमध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मंत्री विनोद तावडे यांनीही मान्यता दिल्याचे कुडाळकर म्हणाले.
कुडाळ शहरातील १ कोटी १० लाखाची नळपाणी योजनेतील निधी मिळावेत व ही योजना सुरू होऊन पाणी पुरवठा चांगला व्हावा, शहरातील भुयारी गटार बांधण्यात यावेत, कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे यासाठी कुडाळ तालुका भाजपाच्यावतीने विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही कुडाळकर यांनी सांगितले.
यावेळी बब्रुवान भगत,संतोष शिरसाट, अजय शिरसाट, उपाध्यक्ष सदानंद अणावकर, बंड्या सावंत, दीपक कुडाळकर, विजय कांबळी उपस्थित होते.