लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित, भाजपा शिष्टमंडळाने वेधले लक्ष
By सुधीर राणे | Published: May 11, 2024 01:23 PM2024-05-11T13:23:37+5:302024-05-11T13:24:11+5:30
कणकवली: लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवावी, ...
कणकवली: लोकसभा निवडणुकीत कणकवली तालुक्यातील काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्यावतीने नेमण्यात आलेल्या खासगी भाड्याच्या गाड्यांवरील चालक आपल्या निवडणूक ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. निवडणूक विभागाच्यावतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यासाठी शासनाने विविध कार्यक्रम देखील घेतले होते. असे असताना देखील कणकवली तालुक्यातील आपल्या निवडणूक विभागाच्या संबधित असलेल्या भाड्यांच्या गाड्यांवरील चालक मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी.
यावेळी भाजपच्यावतीने निवेदन देताना शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, निखिल आचरेकर, समीर प्रभूगावकर, अभय गावकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.