किरकोळ वादातून मुलानेच केला आईचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 08:14 PM2018-03-30T20:14:39+5:302018-03-30T20:15:12+5:30
जेवणाच्यावेळी झालेल्या किरकोळ वादातून पोटच्या पोराने लाकडी तुकड्याच्या साहय्याने जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी आकेरी-गावडेवाडी चव्हाणवस्ती येथे घडली.
कुडाळ - जेवणाच्यावेळी झालेल्या किरकोळ वादातून पोटच्या पोराने लाकडी तुकड्याच्या साहय्याने जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी आकेरी-गावडेवाडी चव्हाणवस्ती येथे घडली. मुलाने केलेले लाकडाचे वार एवढे जीवघेणे होते की, मनीषा चंद्रकांत चव्हाण (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा अनंत चंद्रकांत चव्हाण (३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकेरी-गावडेवाडी चव्हाणवस्ती येथे चार ते पाच घरे आहेत. याच ठिकाणी चंद्रकांत चव्हाण हे पत्नी मनीषा तसेच दोन मुलगे सागर व अनंत यांच्यासह राहतात. त्यांच्या बाजूला मनीषा यांचा भाऊही राहतो. आज घडलेल्या घटनेमध्ये मनीषा चव्हाण यांचा मुलगा अनंत याने गिरणीतून चिरून आणलेल्या लाकडी तुकड्याने वार करून आपल्या जन्मदात्रीचा जीव घेतला. संशयित आरोपी अनंत हा गेले काही दिवस आजारी असल्याने कामावर जात नव्हता. तर त्याचा भाऊ डंपर चालक असून तो आज नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मयत मनीषाचे पती चंदक्रांत हे वालावल येथील बागेमध्ये कामासाठी गेले होते. घरात त्या एकट्याच होत्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत चव्हाण घरी आला व जेवण वाढायला सांगितले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून किरकोळ वाद झाला आणि या वादाचे पर्यावसन दुर्दैवी आणि भीषण घटनेत झाले. वादाच्यावेळी अनंतचा राग अनावर झाल्याने त्याने घरातीलच एका लाकडाच्या तुकड्याने मनीषा यांच्या चेहºयावर आणि गळ्यावर गंभीर केले.
दरम्यान, चव्हाण यांच्या घराच्या बाजूलाच अनंतचा मामा राहतो. तो दुपारी जेवणासाठी घरी आला होता. घराबाहेर हात धुतानाच त्याला चव्हाण यांच्या घरातून मोठा आवाज आल्याने त्याने धाव घेतली असता त्याला आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तर संशयित अनंत हा तेथेच उभा होता. काही वेळातच मनीषा यांचे पती चंद्रकांत आणि दुसरा मुलगा घरी आले. मात्र घरातील भीषण परिस्थिती पाहून ते हादरून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या वैद्यकीय तपासणी पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ते पुरावे जमा केले.
याप्रकरणी संशयिताचा मामा बाबली पांडुरंग चव्हाण याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित अनंत चंद्रकांत चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश भोसले करीत आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वयंपाक घरात रक्ताचा सडा
घराच्या स्वयंपाक घरातच ही घटना घडली. अनंत याने आपल्या आईवर केलेले वार इतके भयानक होते की, संपूर्ण स्वयंपाक घरात रक्ताचा सडा पडला होता. भिंतीवर आणि भांड्यांवरही रक्ताचे शिंतोडे पडले होते. तर रक्ताच्या थारोळ्यात मनीषा यांचा मृतदेह पडला होता.
अनंतला मानसिक आजार
संशयित अनंत हा काही महिन्यांपूर्वी लॅप्टो सदृश आजाराने त्रस्त होता. त्यातच गेले काही दिवस मानसिक दृष्ट्याही आजारी असल्याने तो कामावरही जात नव्हता, अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. घटनेनंतर तो घराच्याच एका पडवीत बसला होता. मात्र आपल्या हातून घडलेल्या या भीषण कृत्याबाबत त्याच्या चेह-यावर कुठल्याही भावना दिसत नव्हत्या.
धारदार हत्याराने वार?
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले की, घटनेत संशयिताने वापरलेला लाकडी तुकडा आम्ही जप्त केला आहे. पण मयत मनीषा यांच्या गळा चिरलेल्या अवस्थेत दिसत असल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राचा वार केला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र असे कोणतेही हत्यार घरातून जप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.