सोनियाची राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत बक्षिसांची लयलूट
By admin | Published: January 7, 2016 11:57 PM2016-01-07T23:57:22+5:302016-01-08T00:48:13+5:30
यश रत्नकन्यांचे '
जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी -सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास छत्रपती शिवाजी मैदानावर न चुकता खो-खोचा सराव करणे, स्पर्धेच्या वेळी तर चार तासांपेक्षा अधिक व सुटीच्या दिवशीही भरपूर सराव करणे. अभ्यासाव्यतिरिक्त खेळाकडे लक्ष केंद्रीत केल्यामुळे सोनिया रवींद्र भोसले हिने आतापर्यंत विद्यापीठीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत खेळून बक्षिसांची लयलूट केली आहे. विविध स्तरांवर सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवली आहेत.
सोनिया सध्या व्दितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असून, शिक्षणाबरोबर तिने खेळाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. इयत्ता आठवीपासून ती खो-खो खेळत आहेत. क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर, पंकज चवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनियाचा सराव सुरू आहे. मुंबई, राजस्थान, नांदेड, फलटण, पुणे, जळगाव येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सोनिया सहभागी झाली आहे. घरात कोणीही खेळाडू नाही. परंतु आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्यामुळे विविध स्पर्धांमध्ये सोनिया सहभागी होत आहे.
खो-खोबरोबर अॅथलेटिक्सचाही सराव सुरू असून, क्रॉसकंट्री, रिले स्पर्धेतही सोनिया यश मिळवत आहे. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभत असून, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रोत्साहनामुळे विविध स्पर्धांतून सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते. खेळ सुरू ठेवून शैक्षणिक अर्हता संपादन करणार आहे. पदवीनंतर शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही सोनिया हिने सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत मजल मारली आहे. परंतु यापुढेही जाऊन खेळायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्याची इच्छा आहे. दररोज न चुकता सराव सुरू असला तरी मार्गदर्शकांकडून मिळालेल्या टीप्सचा वापर खेळातून करण्यात येत आहे, जेणेकरून आपला खेळ आणखी सुधारता येईल. राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असताना समोरचा खेळाडू आपल्यापेक्षा वेगळा कसा खेळतो, याकडे निरीक्षण असतेच, शिवाय आपला खेळ आणखी चांगला करून यश मिळवता येईल, याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करीत असल्याचे सोनियाने सांगितले. रत्नागिरी जिल्हा खो-खोचा महिलांचा संघ उत्कृष्ट असून, दरवर्षी विविध स्पर्धांतून यश मिळवले आहे. सोनिया जिल्हा संघाबरोबर महाराष्ट्राच्या संघातूनही खेळत आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूही उत्कृष्ट खेळ करीत असल्यामुळे संघाने सुवर्णपदक मिळवण्याची पंरपरा कायम ठेवली असल्याचे सांगितले.
इतिहास घडवण्याची इच्छा
सुरुवातीपासूनच क्रिडाक्षेत्रात नाव कमावण्याची इच्छा होती. त्यादृष्टीनेच वाटचाल सुरु केली. आज राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळल्यामुळे अनेक अनुभव आले. त्याचबरोबर खेळताना लागणारा चाणाक्षपणा आणि चपळपणाही आला. भविष्यात एक उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून माझे नाव साऱ्यांना परिचित व्हावे, अशी माझी इच्छा असल्याचे सोनिया भोसले हिने सांगितले.
सोनियाने वर्षभरात मिळवलेले यश
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत कांस्य.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कास्य.
विद्यापीठीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक.
राज्यस्तरीय अश्वमेध महोत्सवात सुवर्णपदक.
राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक.
वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक.
अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य.
राज्यस्तरीय ग्रामीण स्पर्धेत सुवर्णपदक.
आॅल इंडिया राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभाग.