सोनुर्ली माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव, साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:11 PM2017-10-31T15:11:47+5:302017-10-31T15:16:28+5:30
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी होत असून या लोटांगण उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची साफसफाई तसेच वाहनतळ सुविधेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तळवडे , दि. ३१: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी होत असून या लोटांगण उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची साफसफाई तसेच वाहनतळ सुविधेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी व गावकर, गावातील ग्रामस्थ मंडळी जत्रोत्सवाच्या नियोजनात मग्न आहेत. मंदिरासभोवतालचा परिसर स्वच्छ व सुंदर बनविण्यात आला असून, रस्त्यांचेही रूंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना जत्रोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.
दूर गावातून येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा, विद्युत महामंडळ, वैद्यकीय अधिकारी, एसटी प्रशासन, बांधकाम विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. जत्रोत्सवाच्या नियोजनात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची दक्षता मानकरी व ग्रामस्थांनी घेतली आहे.
सोनुर्ली माऊली लोटांगणाचा जत्रोत्सव पूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा गतवर्षीपासून देवस्थान कमिटीने सुरू केली आहे. याअंतर्गत पूर्ण मंदिर परिसरात देखरेख राहणार आहे. वाहनतळाचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या गाड्या वेंगुर्ले व सावंतवाडी आगारातून सुटणार आहेत.