सोनवडे घाटास हिरवा कंदील
By admin | Published: October 18, 2016 12:36 AM2016-10-18T00:36:31+5:302016-10-18T00:48:46+5:30
वन्यजीव विभागाची मंजुरी : चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली, घोडगे-पणदूरचा विकास शक्य
कडावल : वन्यजीव विभागाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे सोनवडे घाटमार्गाबाबत गेल्या चाळीस वर्षांची प्रतीक्षा अखेग्रामपंचायती अजून जुन्याच शतकात
जिल्हा परिषद : देश हायटेक झाला तरी ३५४ ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधाच नाहीर संपली. नियोजित मार्गामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतुकीचे अंतर कमी होण्याबरोबरच घोडगे ते पणदूरपर्यंतच्या विकासालाही चालना मिळणार आहे. तसेच सावंतवाडी-हिर्लोक- कडावलमार्गे कोल्हापूर असा दळणवळणासाठी कमी अंतराचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या भागातील व्यापार-उद्योग व पर्यटन व्यवसायालाही उर्जितावस्था येणार आहे. यासाठी शासन व प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून नियोजित घाटमार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होणे गरजेचे आहे.
पश्चिम घाट विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सोनवडे घाट रस्त्याचे काम विविध कारणांमुळे गेली चाळीस वर्षे रखडले होते. या मार्गाला पहिला अडसर ठरला तो वनविभागाचा. घाटमार्ग सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील हद्दीमधून वन विभागाच्या अख्यत्यारितील जमिनीमधून जात असल्याने हा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला. रस्त्यासाठी स्वमालकीची जेवढी जमीन घेण्यात येईल, तेवढी जमीन वर्ग करून मिळावी, अशी वनविभागाची अट होती.
या अटीमुळेच सोनवडे घाटमार्गाचे घोंगडे गेली पस्तीस वर्षे भिजत पडले होते. रस्त्यासाठी कोल्हापूर हद्दीतून जाणाऱ्या वनविभागाच्या जमिनीच्या बदल्यात शाहूवाडीतील मांजरी येथील तसेच नांदेड येथील जमीन वर्ग करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनविभागाच्या २० हेक्टर जमिनीसाठीही नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील १० हेक्टर व नायगाव तालुक्यातील लिनगव्हाण येथील १० हेक्टर जमीन देण्यात आल्याने वनखात्याचा प्रश्न निकाली निघाला.
वनखात्याचा अडसर दूर झाला तरी, या मार्गाबाबत अडथळ्यांची मालिका संपली नव्होती. वनविभागानंतर वन्यजीव विभागाने डोके वर काढले. वन्यजीव विभागाच्या अटींमुळे गेली चार वर्षे काम खोळंबून राहिले होते. या घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कृती समिती व विविध पक्ष संघटनांनी लावलेल्या रेट्यामुळे वन्य प्राण्यांच्या अभ्यासासाठी एन्वरयो कन्सल्टंट कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. या कंपनीने तेथील जंगल परिसराचा अभ्यास करून गत नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल सादर केला. वन्य प्राण्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण न करता घाटरस्ता करण्यास हरकत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. याशिवाय भारतीय वन्यजीव संस्थेचे अभ्यासक इंद्र्रनील मोडल व आकांक्षा सक्सेना यांनीही या घाटमार्गाचा अभ्यास करून अहवाल शासनास सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व भारतीय वन्य जीव संस्थेचे संचालक यांच्यात डेहराडून येथे झालेल्या बैठकीत काही अटी घालून अखेर या घाटमार्गाला मंजुरी देण्यात आली.
कोकणातून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी सध्या फोंडा घाट, करूळ घाट व आंबोली घाटमार्गाने जावे लागते. मात्र, कोसळणाऱ्या दरडींमुळे हे मार्ग असुरक्षित झाले आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने या घाटांमधील वाहतूक अनेकदा बंद ठेवावी लागते. शिवाय या तिन्हीही घाटमार्गांची लांबी जास्त असल्याने घाट चढण्यास किंवा उतरण्यास बराच वेळ लागतो.
धोकादायक वळणांमुळेही येथील प्रवास असुरक्षित बनत आहे. सोनवडे घाटमार्गात केवळ साडेपाच किलोमीटर लांबीचा घाटरस्ता असल्याने येथून वाहतूक करणे वाहनचालकांसाठी सोयीचे व सुरक्षित होईल. तसेच या मागार्मुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर सुमारे ४० किलोमीटरने कमी होणार आहे. (वार्ताहर)
प्रशासनाकडून सकारात्मक कामाची गरज
वन्यजीव संस्थेने हिरवा कंदील दाखविल्याने गेली चार दशके सातत्याने मागणी होणाऱ्या सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लागून एकदाचे गंगेत घोडे न्हाले आहे. या मार्गामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवासी अंतर कमी होण्याबरोबरच गारगोटीसह घोडगे दशक्रोशीच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच पणदूर ते घोडगे या टापूतील गावांचाही सर्वांगीण विकास होणार आहे. त्याचबरोबर सावंतवाडी-माणगाव-हिर्लोक-कडावलमार्गे कोल्हापूर असा दळणवळणासाठी कमी अंतराचा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन या भागातीलही व्यापार-उद्योग तसेच पर्यटन विकासालाही गती मिळणार आहे. यासाठी प्रशासन व शासनाने सकारात्मक पावले उचलून नियोजित घाटमार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे.