सिंधुरत्नमधून रेल्वे टर्मिनस परिसराचे लवकरच सुशोभीकरण - मंत्री केसरकर
By अनंत खं.जाधव | Published: December 25, 2023 06:16 PM2023-12-25T18:16:32+5:302023-12-25T18:22:55+5:30
टर्मिनसबाबत रेल्वे राज्यमंत्र्यांना भेटणार
सावंतवाडी : मळगाव रेल्वेस्टेशनला टर्मिनस दर्जा यापुर्वीच मिळाला आहे. आता याठिकाणी जास्तीत जास्त गाड्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्याच बरोबर रेल्वेस्टेशन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सिंधूरत्न योजनेतून निधी दिला जाईल, त्याच बरोबर रेल ओ टेल हाॅटेल बरोबरच पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
दरम्यान कोकण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या पुर्ण होण्यासाठी प्रथम मुख्यमंंत्र्यांशी चर्चा करुन आवश्यक निधी दिला जाईल, त्याच बरोबर जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेवून मागणी केली जाईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी मंत्री केसरकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदिप निंबाळकर, मिहीर मठकर, जगदिश मांजरेकर, रवींद्र ओगले, सागर तळवडेकर, रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, रफीक मेमन, नकुल पार्सेकर उपस्थित होते.
याठिकाणी रेल्वे स्टेशलला यापुर्वीच टर्मिनसचा दर्जा मिळाला आहे. मात्र कोरोनाच्या काळात रेल्वे नुकसानीत गेल्यामुळे दुर्दैवाने आवश्यक असलेला निधी उपलब्ध होवू शकला नाही. त्यामुळे हे काम रेंगाळले होते. मात्र आता या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात, टर्मिनसच्या परीसरात सुशोभीकरण व्हावे, मुख्यत्वे पाण्याची सोय व्हावी आणि त्याठिकाणी येणार्या प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेल ओ टेल उभारण्यात येणार आहे. त्या आराखड्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. मात्र हे सुध्दा काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मंत्री केसरकर म्हणाले, परिसरातील रस्त्याचा विकास व्हावा यासाठी यापुर्वीच अडीच कोटी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. गाड्या कोणत्या थांबवाव्यात याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होतो. त्यामुळे आत्ताच यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. परंतु वंदे भारतसह जास्तीत जास्त गाड्या थांबण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्याची भेट घेवून चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे २६ जानेवारीला संघटनेेकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात यावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.