सावंतवाडीत फु्रट अँड फ्लॉवर फेस्टिव्हल
By admin | Published: April 26, 2015 10:23 PM2015-04-26T22:23:07+5:302015-04-27T00:10:58+5:30
नगरपालिकेचे सहकार्य : १ ते ४ मे रोजी विविध कार्यक्रम
सावंतवाडी : कोकणात अनेक फळे-फुले आहेत. त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे. यासाठी सावंतवाडीत प्रथमच नगरपालिकेच्या सहकार्याने ‘फ्रुट अँड फ्लॉवर फेस्टिव्हल आॅफ मोती तलाव २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल १ ते ४ मे पर्यंत चालणार आहे. यामध्ये देशी-विदेशी फुले आणि फळे ठेवण्यात येणार असून यानिमित्ताने विविध व्याख्यानेही आयोजित करण्यात आल्याची माहिती या फेस्टिव्हलचे आयोजक सचिन देसाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अॅड. सुहास सावंत, नगरसेविका अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, कोकणात अनेक फळे- फुले असून त्यांचे मूल्यही मोठे आहे. यातील काहींमध्ये औषधी गुणधर्मही आढळतात. याची दखल देशस्तराबरोबरच आंंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. अशा फुला-फळांना फेस्टिव्हलच्या माध्यमातून एक बाजारपेठ निर्माण करून द्यावी, यासाठी या फेस्टिव्हलची निर्मिती करण्यात आली आहे. या फेस्टिव्हलला खास मोती तलाव, असे नावही देण्यात आले आहे. जेणेकरून या फेस्टिव्हलचा तो ब्रँड झाला पाहिजे. तसेच दरवर्षी असे फेस्टिव्हल होत राहिले पाहिजेत, असा यामागचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवात ३७ स्टॉल लावण्यात येणार आहेत. यासाठी दोन महिने परिसरातील गावात जाऊन महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. फुलातून, फळातून काहीतरी निर्मित होते, हे दाखवणे हाच यामागचा उद्देश आहे. नारूर गावच्या स्टॉलवर कातकरी पद्धतीचा जंगली मध, शोपीस, धनुष्य बाण, गावठी कडधान्य, भाजीच्या केळी आदी वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. नेमळे गावची सेंद्रीय फळभाजी, गोपुरी आश्रमच्या स्टॉलवर खारे काजू, मसाला काजू, वेंगुर्ले येथील स्टॉलवर थंडगार काजू बोंडू, आवळा, कोकम सरबत आदी विविध पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे.
महोत्सवात जास्वंद या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात येणार असून, त्याचे फायदेही सांगण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे बेळगाव येथील मितान या प्रसिद्ध डेक्कनी लोकरीपासून फळ- फुलांना रंग काढलेल्या विविध बॅग, कपडे, निरक्षर आदीवासींकडून होणाऱ्या रंगांचा अभ्यास करण्यासाठी हॉवर्ड विद्यापीठानेही विशेष निमत्रंण दिले होते. तेही यात सहभागी होणार आहेत
१ ते ४ मेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. महोत्सव येथील जनरल जगन्नाथ भोसले उद्यानात भरवण्यात येणार असून १ मे रोजी सकाळी १० वाजता कातकरी मुलांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. चित्रकथी, पेंन्टींग कार्यशाळा, एनर्जीे आॅफ माय लाईफ, वरिष्ठ नागरिक नाडी परीक्षण, ठाकर कला, पपेट शो असे पहिल्या दिवशीचे कार्यक्रम असणार आहेत. दुसऱ्या दिवशी गावातील पारंपरिक खेळ दाखवण्यात येणार असून तिसऱ्या दिवशी रोल मॉडेल आॅफ कोकण वसंत गंगावणे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. यावेळी ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि कोकणची जैवविविधता संवाद’ यावर अॅड. असिम सरोदे व्याख्यान देणार आहेत.
सायंकाळी धारवाड कर्नाटक येथील बाल कलाकारांचा भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी ‘सेंद्रीय शेतीसाठी नवसंजीवनी’ या विषयावर व्याख्याने देण्यात येणार आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. या महोत्सवाला नगरपालिका पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)