गेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:12 PM2020-09-08T16:12:35+5:302020-09-08T16:14:41+5:30
राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.
कणकवली : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्यामुळे सर्व महिन्यांची वीज देयके येताच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.
कणकवली येथील वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने धडक दिली . तसेच जनतेच्या व्यथा कार्यकारी अभियंत्यांसमोर मांडल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , कणकवली मंडल अध्यक्ष राजन चिके,संतोष कानडे, वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काझी, देवगड मंडल अध्यक्ष रवी पाळेकर ,भालचंद्र साठे, जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, वैभववाडी माजी उपसभापती हर्षदा हरयाण ,रमेश पावसकर,बुलंद पटेल,मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, बबलू सावंत, राजू पेडणेकर, सुशील सावंत,प्रकाश पारकर, अण्णा कोदे , समर्थ राणे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे गेले ६ महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॉकडाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरु झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. अनेकांना घरभाडे भरता आलेले नाही . त्याचबरोबर वीज बिलही भरता येत नाही.
वीजदर वाढीबद्दल अगोदरच लोकांच्या मनात नाराजी आहे. त्यातच रोजीरोटी सुरु नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न आहे. याचवेळी महावितरण कडून वीज बिले भरण्याचा तगादा सुरु आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करुन तातडीने सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यत वीज वापर करणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनींना ९० हजार कोटींचे अर्थ सहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिल माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहचवावी. असेही या निवेदनात म्हटले आहे.
कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी !
यावेळी ' सत्ताधारी महाविकास आघाडीचा निषेध असो' , 'ठाकरे सरकार हाय, हाय' , 'भरमसाठ विजबिले मागे घ्या', ' वाढीव वीजबिल आकार कमी करा' अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.