पावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:33 PM2019-06-19T13:33:10+5:302019-06-19T13:34:40+5:30
गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे.
बांदा : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे.
बांदा परिसरात मान्सुनपूर्व पावसाची प्रतीक्षा होती. वरूणराजाच्या आगमनाकडे बळीराजा चातकाप्रमाने डोळे लावून बसला होता. संपूर्ण मृगनक्षत्र यावर्षी कोरडे गेले. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यातच चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली होती. पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या माऱ्याने हैराण झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.
दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतीकामात गुंतला असून भात पेरणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. बाजारपेठेत भात बियाण्यांचे दर वाढलेले असताना सुद्धा शेतकऱ्यांचा कल खरेदी करताना दिसत आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य (भात) राबवून घेतले जाते.
यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मशागत पूर्ण करून बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारपासून वरुणराजा बरसण्यास प्रारंभ झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामात गुंतला आहे.
पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेतीचे काम सुरु असून मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बहुतांश या भागातील शेतकऱ्यांनी रानटी प्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतीकडे पाठ फिरवली असून
शेकडो एकर जमीन पडीक राहिली आहे. उपद्रवी प्राण्यांचा वावर वनविभागाने थांबवून आमची शेती, बागायती तसेच अन्य लागवड वाचविण्याची मागणी स्थानिक शेतककडून होत आहे.